Wednesday, February 29, 2012

ऑस्ट्रेलिया आणि वर्णद्वेष – २ : ब्रेन वॉशिंग!


ह्यापूर्वी, ह्या विषयावर : भाग १

मे २००९ मध्ये मेलबर्न शहराच्या भागात होणाऱ्या हल्ल्यांची वृत्तं यायला लागली. सुरुवातीपासूनच भारतीय माध्यमांमध्ये ह्या हल्ल्यांची वर्णनं 'वर्णद्वेषी' हल्ले अशी व्हायला लागली. ह्याला तर्कशास्त्रात "Fallacy of Hasty Generalisation" म्हणतात! हल्ल्यांचा परामर्श घेताना; मेलबर्न हे एक प्रचंड शहर आहे, तिथे चांगले-वाईट भाग आहेत (जसे कोणत्याही मोठ्या शहरात असतात), वेगवेगळ्या भागात गुन्हेगारीचं प्रमाण आणि गुन्हेगारीचे प्रकार वेगळे असू शकतात, हल्ले कोणत्या वेळी झाले आणि रात्री-अपरात्री झाले असल्यास त्या व्यक्ती तिथे कशाला गेल्या होत्या... ह्याचा विचार केला गेल्याचं दिसलं नाही! मुंबई एरवी सुरक्षित वाटली, तरी शहाणा माणूस रात्री काही भागांमध्ये जायला धजावत नाही ना! ऑस्ट्रेलिया मध्ये गोरे मायकेल दारू पिऊन दंगा करतात, अशा काही पूर्वग्रहातून ह्या हल्ल्यांना वर्णद्वेषी हल्ले म्हणून सनसनाटी बातम्या लिहिणं त्यांना सोयीचं वाटलेलं दिसलं!

ऑस्ट्रेलिया मध्ये, व्हिक्टोरिया राज्यातले पोलीस तसंच इतर महत्वाच्या व्यक्तींनी सावधगिरीचा पवित्र घेतला. "ह्या हल्ल्यांच्या मागे वर्णद्वेष असेल असं दिसत नाही", "हा रात्रीच्या गुन्हेगारीपैकी प्रकार आहे" इत्यादी. अशा पवित्र्यामागे दोन कारणं असावीत. एक म्हणजे (आणि हे व्यावहारिक कारण वाटतं), पोलिसांना रात्रीच्या गुन्हेगारीचा बराच अनुभव आहे. दुसरं कारण असं, की भक्कम पुराव्याशिवाय वर्णद्वेषाचा प्रकार मान्य करणं ऑस्ट्रेलियामध्ये अवघड आहे. बहुसांस्कृतिक ऑस्ट्रेलियामध्ये वर्णद्वेष हा गंभीर मामला मानला जातो. नित्याच्या व्यवहारात सुद्धा वर्णद्वेषाचा आरोप गंभीर मानला जातो, त्यातून हिंसा / दुखापत झाल्यास त्याची दाखल घ्यावीच लागते. छुपा किंवा उघड उघड वर्णद्वेष ऑस्ट्रेलिया मध्ये आहे की नाही हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे, आणि त्यावर मी नंतर भाष्य करणार आहे.

मित्रांच्या आणि नातलगांच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं, की दृक-श्राव्य माध्यमांमध्ये (टीव्ही इ.) भारतामध्ये २४ तास वर्णद्वेषाचे ताशे वाजत होते. अनेकांनी आमची इ-मेल वर चौकशी केली, काहींनी फोन केले. "इथे सर्व शांत आहे, आम्हाला काहीही त्रास नाही" हे सांगून आम्ही थकलो. काही वेळा, आमच्या सांगण्यावर भारतातल्या आप्तांचा विश्वास बसेना - "अरे आम्ही इथे सतत टीव्हीवर काय पाहतो आहोत!" म्हणजे एकंदर चित्र असं, की जणू ऑस्ट्रेलिया मध्ये गोऱ्या तरुणांचे जमाव रस्त्यास्त्याने फिरताहेत आणि भारतीयांना टिपताहेत! १९६८-६९ च्या मुंबईची आठवण झाली मला तर! (तेव्हा शिवसेनेचा रोख दाक्षिणात्यांवर होता.) गैरसमज गंभीर होता, एरवी मला तर असं फोन आला की हसूच यायचं!

मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून च्या सुरुवातीला, भारतात 'हे हल्ले वर्णद्वेषातून उद्भवतात' ही समजूत पक्की झाली होती असं दिसतं. कोणत्याही अशा प्रकारच्या बातमीत वर्णद्वेष हा शब्द आल्याशिवाय राहत नसे! एका 'प्रतिष्ठित' इंग्रजी वृत्तपत्रातला एक मथळा : "वर्णद्वेषाच्या हल्ल्यांपैकी एका हल्ल्याला बळी पडलेला xxx ह्याला इस्पितळातून घरी पाठवण्यात आलं". (“…xxx, who was attacked on last Monday night in one of several racial attacks on Indian students in Australia, was discharged from the … hospital”).

खरं तर ह्या वेळेपर्यंत बऱ्याच हल्ल्यांमागची खरी परिस्थिती बाहेर आलेली होती. बऱ्याच हल्ल्यांमागचे गुन्हेगार गोरे नव्हते हे दिसून आलं होतं. काही हल्ले इतर गटांच्या लोकांनी केले होते. मध्यपूर्वेच्या काही टोळ्या सिडनी / मेलबर्न भागात आहेत हे सर्वश्रुत होतं. काही हल्ल्यांमध्ये तर हल्लेखोर चक्क भारतीय होते! जुनं वैर, बेबनाव, पैशाच्या व्यवहारातून उद्भवलेले तंटे अशा गोष्टी पण बाहेर आल्या. पण लक्षात घेतो कोण! प्रत्यक्ष पर्थ मध्ये पण एक खून झाला. आपल्याच शहरात झाला म्हटल्यावर आम्ही अर्थातच चकित झालो - दुसऱ्याच दिवशी बातमी आली, की पैशाच्या वैमनस्यातून हा खून झाला, संशयित भारतीयच होता आणि तो एका दिवसात पळाला सुद्धा!

अशा प्रकारांमध्ये बक्षीसपात्र प्रकरण झालं ते एका भारतीयाने "मला मारहाण करून जाळण्याचा प्रयत्न झाला, माझी गाडी जाळून टाकली" म्हणून आरडाओरड केली त्याचं. तपासाअंती असं समजलं की खोटा विम्याचा दावा लावण्यासाठी त्याने स्वतःच्या गाडीला आग लावली आणि त्यात चुकून स्वतः पण भाजला. दुसर्या एका प्रकरणात एक लहान मुलगा बेपत्ता झाला, नंतर त्याचा मृतदेह सापडला - संशयित त्या मुलाच्या पालकांच्या ओळखीचे निघाले.

पण वर्णद्वेषाचे ढोल इतके कर्णकर्कश वाजत होते की सत्य परिस्थिती कोणाला ऐकू गेली नाही!

वर म्हटल्याप्रमाणे, कोणाही पत्रकाराने प्रत्येक प्रकरणाची शहानिशा केलेली दिसली नाही. खरं तर प्रत्येक प्रकरण स्वतंत्र समजून त्याचा मागोवा घ्यायला पाहिजे होता. काही हल्ले अशा उपनगरात झाले होते की तिथे स्थानिक रहिवासी (गोरे/काळे/तांबडे - कोणीही असोत!) वेळी-अवेळी जात नसत. जबाबदार पालक आपल्या पाल्यांना अशा ठिकाणी रात्री उशिरा न जाण्याचा सल्ला देतात, त्याच प्रमाणे सार्वजनिक परिवहनाचा वापर करू नका असंही सांगतात. त्या काळात किमान दोन हल्ले अशा ठिकाणी, अपरात्री झालेले होते.

वृत्तपत्रांची ही तऱ्हा, त्यातल्या बातम्यांवर प्रतिक्रिया देणारे वाचक त्याहून महान. अज्ञान, बिनबुडाचे आरोप आणि शिवराळ भाषेचा तिथे कहर झाला. आंतरजालावर निनावी, बिनचेहऱ्याची वक्तव्यं करता येतात ह्याचा लोकांनी पुरेपूर फायदा घेतला! खरं तर वृत्तपत्रं अशा प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवतात म्हणे! इथे नियंत्रण अभावानेच दिसत होतं! ऑस्ट्रेलिया च्या लोकांच्या रक्तातच गुन्हेगारी भिनलेली आहे कारण शेवटी ते गुन्हेगारांचेच वंशज आहेत, हे गोरे बिनडोक आहेत, ह्यांना दारू पिऊन मारामाऱ्या करण्याशिवाय दुसरं येतं काय... अशी अनेक वक्तव्यं, खास शिव्यांनी अलंकृत केलेली, पहायला मिळाली. अर्थात ह्या गदारोळात भारतातल्या काही वाचकांनी संतुलित प्रतिक्रिया सुद्धा लिहिल्या होत्या हे निर्विवाद, पण एकंदर कल्लोळात त्या कुठल्याकुठे गडप झाल्या. आणि एखाद्या ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीयाने "आम्हाला नाही बुवा असा अनुभव" असं म्हटलं, की त्याच्यावर शाब्दिक मारपीट : "हे गोऱ्यांचे बूट चाटे", "ह्यांना स्वाभिमान नावाची वस्तूच नाही", "हे डॉलर चे भुकेले गुलाम"...

आणखी एक नमुनेदार प्रकार म्हणजे वृत्तपत्रात ब्लॉग लिहिणारे काही महाभाग. त्यातले काही तर म्हणे वृत्तपत्राच्या संपादकीय मंडळात असतात! एका 'ब्लॉगर'ने त्याच्या एका पोस्ट ची सुरुवात केली ती ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या काही भारतीयांच्या वक्तव्याने. त्यांचा सूर असाच होता की आम्हाला तर इतक्या वर्षात वर्णद्वेषाचा अनुभव आला नाही. एवढं लिहून मग त्या ब्लॉगर ने टोपी फिरवली. ("पत्रकार म्हणून, दोन्ही बाजू सांगणं हे माझा कर्तव्य आहे" - किती उदात्त!) तो पुढे म्हणतो, "तरी, मी ह्या लोकांशी सहमत नाही - हे हल्ले वर्णद्वेशातूनच झाले आहेत." त्याच्या ब्लॉग वर प्रतिक्रिया लिहिणाऱ्यात सध्या ऑस्ट्रेलिया मध्ये असलेले विद्यार्थी सुधा होते, तेही म्हणाले की असं काही होत नाही इथे. मी स्वतः सुद्धा प्रतिक्रिया दिली, "हे सगळे इथे राहणारे विद्यार्थी काय म्हणताहेत? त्यावर तुझं काही म्हणणं आहे, की आगलावेपणा करून यु नुसती गम्मत बघत बसणार?" ह्यावर त्याने उत्तर दिलं नाही! पण दुसऱ्या एका प्रतिक्रियेला प्रत्युत्तर म्हणून तो म्हणाला, "मेलबर्न मध्ये ज्या ५००० विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली त्यांना नक्कीच वाटतं की इथे वर्णद्वेष आहे". घ्या! "वर्णद्वेष, वर्णद्वेष" म्हणून आक्रस्ताळेपणा केला की ५००० जमा व्हायला वेळ लागत नाही! त्यात त्यांच्या मनात थोडी भीती घातली की मग काय!

त्या ५००० च्या जमावाने "शांततापूर्ण निदर्शनं" केली. त्यांच्या दुर्दैवाने, 'शांततापूर्ण निदर्शना'ची भारतातली व्याख्या आणि इथली व्याख्या निराळी आहे. ह्या ५००० च्या जमावाने मेलबर्न मधल्या मोक्याच्या ठिकाणी (मेलबर्न चं "सी एस टी") संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा केला. प्रचंड नारेबाजी केली, येणाऱ्या-जाणार्या स्थानिकांना शिवीगाळ केली. (यूट्यूब वर म्हणे त्याचे व्हिडीओ आहेत). सर्वात वाईट म्हणजे, "वारसा" (हेरीटाज) मानलेल्या इमारतीची किरकोळ का होईना, नासधूस केली. त्यांच्या नेत्याने नंतर सांगितलं की त्यांचं निदर्शन शांततापूर्णच होतं, इतर समाजकंटक संधीसाधूंनी त्याचा फायदा घेतला. वर उल्लेख केलेल्या ब्लॉगरला वैयक्तिक मानसशास्त्र आणि जमावाचं मानसशास्त्र ह्यातला फरक कळू नये हे नवलच. आणि हो! त्याचा म्हणे पत्रकारितेचा १५ वर्षांचा अनुभव आहे (तो ही भारतातला!). निदर्शकांचे नेते काही काळ का होईना ऑस्ट्रेलिया मध्ये राहिलेले आहेत, त्यांना भारतातल्या आणि इथल्या निदर्शानान्मधला फरक जाणवला नाही हेही एक नवलच.

एका मराठी पत्रकाराने थोडीवेगली भूमिका घेतली. त्याच्या लेखाचं नाव "भय्ये - मुंबईचे आणि मेलबर्नचे"! तत्वतः मी अशी तुलना केली नसती. जागतिक स्तरावरचा वर्णद्वेष आणि भारतामधला प्रांतीयवाद किंवा जातीभेद ह्यात थोडा फरक आहे - साम्यही आहे, पण तो मुद्दा अलाहिदा. तरीही, "भय्ये - मुंबईचे आणि मेलबर्नचे" या लेखात काही मार्मिक विधानं होती. पण एवढं असूनही, ह्या पत्रकाराने एक घोर चूक केली! बातम्या नीट न वाचता "उचलली जीभ...". त्याचा लेख पसिद्ध झाला तो मेलबर्न मध्ये मृत्यू होण्याच्या आधी. तरी, त्याच्या म्हणण्याप्रमाणे : "गेल्या दहा दिवसांत ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर एकामागून एक हल्ले झाले. गोऱ्यांनी भारतीय मुलांना जीव जाईस्तोवर मारलं.काहींचे मृतदेह भारतात आले." मी त्याला विचारलं (त्या वर्तमान पत्रातली प्रतिक्रियेची सुविधा वापरून), "हा शोध तुम्हाला कुठे लागला?" उत्तर मिळालं नाही हे सांगणे नलगे! "बेजबाबदार पत्रकारिता" ह्या घोडचुकीवर मुकुट चढला आपली चूक मान्य/दुरुस्त करण्याचा.

ऑर्कुट वरचे अनुभव आणखीच रसभरीत. (आता रसभरीत म्हणून हसू येतं, तेव्हा संताप व्हायचा.) तीन समूहांवर ह्या चर्चा चालल्या. शेवटी दगडावर डोकं आपटून घेतल्यासारखा वाटायला लागलं. सर्वसाधारणपणे सूर वर्तमानपत्रातल्या प्रतिक्रिया चर्चांचाच. "तुम्ही काय, फिरंगी अनिवासी भारतीय" अशा अर्थाचा. दोन्ही ठिकाणी, सर्वात टोचणी लागायची ती अशासाठी, की बाहेरचं जग पाहता, अज्ञानाच्या भिंतींच्या घरात बंदिस्त राहून, आंतरजालाच्या बुरख्याच्याआतून वार करायला ही मंडळी यथेच्छ कीबोर्ड बडवत बसायची! त्यातल्या काही नमुनेदार गोष्टी, योग्य संदर्भात पुढच्या काही भागांमध्ये सांगेनच!

मला पूर्ण कल्पना आहे, की ह्या सारांशसदृश लिखाणामुळे उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त उभे राहिले असणार. ही पोस्ट अवाच्यासवा मोठी होऊ नये म्हणून आवरती घेतो. अशा काही प्रश्नांवर थोडा प्रकाश आत्ता पाडता येईल :
  • ऑस्ट्रेलिया मध्ये वर्णद्वेष अजिबात नाही असं मला म्हणायचं आहे का? थोडक्यात उत्तर : वर्णद्वेष नाही असं ठिकाण जगात नाही. उघड उघड, कायदेशीर रीत्या, किंवा छुपा वर्णद्वेष सगळीकडेच आहे. त्याचा कोणाला, आणि खरोखर किती त्रास होतो हे पाहणं महत्वाचं आहे.
  • ऑस्ट्रेलिया हा गुन्हेगारांच्या वंशजांचा देश आहे ना? असली विधानं केवळ 'प्रगल्भ' अज्ञानातूनच जन्म घेऊ शकतात! मनाचे दरवाजे उघडे ठेवून, थोडा इतिहास पहिला तर असे प्रश्न उद्भवणार नाहीत!
  • भारतीय विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येने तिकडे शिकायला का जातात? ह्या प्रश्नाच्या उत्तरात अनेक मनोरंजक गोष्टी दडलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आणखी पण बरीच मनोरंजक माहिती बाहेर येईल.
  • ऑस्ट्रेलिया मध्ये खरोखरच जीवनशैली कशी आहे? ह्याचं माझ्या नजरेतून, मला मिळालेलं उत्तर जरूर देईन.

आणखी बरंच काही, लवकरच!

***************************

ऑस्ट्रेलिया आणि वर्णद्वेष - १ : माध्यमांचा धुमाकूळ.

यापुढील ह्या विषयावरच्या पोस्ट्स बद्दल थोडं...


हा ब्लॉग लिहायचा विचार प्रथम बळावला तो २००९ मध्ये, ऑस्ट्रेलिया मध्ये "भारतीय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या वर्णद्वेषी हल्ल्यां"च्या संदर्भात. वर्तमानपत्रात ह्या विषयावर माजलेला धुमाकूळ मी समाचार.कॉम वर वाचत होतोच, शिवाय ऑर्कुट वरच्या समूहांमध्ये जोरदार चर्चा चालू होत्या. मी सभासद असलेल्या दोन-तीन समूहांवर मी थोडा वेगळा दृष्टीकोन घेतल्याबरोबर माझ्यावर जोरदार शाब्दिक हल्ले झाले! पुन्हा पुन्हा गोल फिरून त्याच त्याच मुद्द्यांना प्रत्युत्तर द्यायचा कंटाळा आला आणि मी ब्लॉग लिहायचं ठरवलं. कामाच्या गडबडीत त्या वेळी हे शक्य झालं नाही. अलीकडे जेव्हा ब्लॉग ला प्रत्यक्ष सुरुवात केली तेव्हा असं वाटलं कि हा विषय आता मृतवत झाला आहे.

ह्या वर्षाच्या सुरुवातीस भारत भेट झाली आणि प्रकर्षाने जाणवलं, की हा विषय आणि त्यासंबंधीचे गैरसमज अजूनही गरमागरम आहेत! आश्चर्याची गोष्ट अशी, की सुशिक्षित, व्यावसायिक व्यक्तींनी विचारलेल्या प्रश्नातून पण जाणवलं की त्यावेळी माध्यमांनी केलेल्या 'ब्रेन वॉशिंग' चा पगडा अजूनही पक्का आहे. "अरे हो, तिथे यायचा विचार होता, पण ते वर्णद्वेषी हल्ले वगैरे होतात ना, त्यामुळे...". अजूनही, लोकांच्या मनात, "भारतीय विद्यार्थ्यांवर झालेले वर्णद्वेषी हल्ले" असतात, नुसते हल्ले नसतात! तेव्हा असं वाटलं, की ह्या विषयावर लिहायलाच पाहिजे.

माझे त्यावेळचे, आणि आताही, मुख्य मुद्दे असे : भारतीय माध्यमांनी ह्या घटनांना पूर्णपणे विकृत स्वरूप दिलं आणि ऑस्ट्रेलिया मधले (गोरे) लोक वर्णद्वेषी आहेत असं एक साचेबंद चित्र (stereotype) तयार केलं. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की, हे करतांना माध्यमांनी ह्या घटनांमागची गुंतागुंतीची परिस्थिती समजून घेण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही; आणि ह्यात त्यांचा बेजबाबदारपणा दिसून आला. ऑस्ट्रेलिया बद्दलचं अपरिमित अज्ञान पण दिसून आलं.

पुढे लिहिण्याच्या आधी काही गोष्टींचा खुलासा करणं आवश्यक आहे, तसंच, पुढील पोस्ट्स वाचतांना ह्या गोष्टींचं भान ठेवणं आवश्यक आहे : माझा दृष्टीकोन हा सर्वसमावेशक आहे. कोणताही विचार एकांगी होऊ नये असा माझा प्रयत्न असतो. माध्यमातल्या बातम्या आणि इतर समालोचन हे नेहमीच ह्या दृष्टीकोनातून लिहिलं जात असेल असं नाही! त्यामुळे, अशा बातम्या इत्यादीबद्दल मी थोडा साशंक असतो. मी जन्माने भारतीय आहे, ह्याचा मला अभिमानही आहे, पण मला तो अभिमान फलकांच्या द्वारे मिरवण्यात स्वारस्य नाही. मी ऑस्ट्रेलियामध्ये जवळ जवळ १० वर्षं राहिलो आहे आणि इथल्या रीतीभाती आणि इतिहास ह्यांचं निरीक्षण आणि अभ्यास केला आहे. माझं नागरिकत्व दुहेरी आहे. भारतामध्ये अनिवासी भारतीयांबद्दल काही साचेबंद कल्पना आहेत ("हे काय, तिकडे जाऊन फिरंगी होतात आणि मग आम्हाला उपदेश करतात") त्यात मी बसत नाही! जे आहे ते सत्य, मग ते कटू का असेना, पचवता यावं असा माझा आग्रह असतो. लिखाणावरच्या प्रतिक्रिया मला आवडतात, पण कमरेखालचे वार मी परतवतो!

***********************

Thursday, February 23, 2012

डॉ. उज्वला (रेगे) दळवी : डॉक्टर आणि लेखिका


जून १९६७... रुइया कॉलेज मधला पहिला आठवडा. फिजिक्सच्या तासाला प्रा. पर्वते यांचं लेक्चर होतं. सरांनी सुरुवात केली : "ह्यावर्षी (नेहमीप्रमाणे!) आपल्या कॉलेजमध्ये बोर्डाच्या यादीवरची (मेरिट लिस्ट) मुलं आलेली आहेत. बोर्डात पहिला आलेला विद्यार्थी सुद्धा आपल्या कॉलेज मध्ये आहे. ह्या सर्वांचं कौतुक म्हणून, मी टक्केवारी सांगेन त्याप्रमाणे त्या मुलांनी उभं राहावं - आपण सर्व मिळून त्यांचं अभिनंदन करू." 'बोर्डात आलेल्या' विद्यार्थ्यांपैकी एक होती उज्वला रेगे. खरं तर सरांनी केलेल्या कौतुकामध्ये थोडीशी ओशाळून गेल्यासारखी दिसत होती! पुढच्या दोन वर्षात माझ्या दृष्टीने तिची ओळख केवळ 'बोर्डात आलेली रेगे' एवढीच होती. प्रकर्षाने जाणवलं ते असं की तिच्या चेहऱ्यावर '' ची बाधा अजिबात नव्हती. अतिशय शांत आणि नम्र अशी विद्यार्थिनी होती ती.

पुढे, रुइया कॉलेज मधून रग्गड १६ विद्यार्थी एक साथ जी. एस. मेडिकल कॉलेज मध्ये गेले. त्यात उज्वला पण. तिथे सुद्धा तिची ओळख अभ्यासू, हुशार आणि शांत विद्यार्थिनी अशीच होती. आज मी हे लिहितो आहे, पण मेडिकल कॉलेजच्या त्या पाच वर्षात ह्याच्या पलीकडे तिची माझी ओळख नव्हती. फार काय, तिला किती बक्षिसं मिळाली त्याचीही मला गणती नव्हती. ओळख होती ती केवळ 'आहे एक वर्गभगिनी' एवढीच. एक तर मला थोडे मित्र होते, आणि मैत्रिणी तर नव्हत्याच!

एमबीबीएस चे दिवस सरल्याला ३६ वर्षं होऊन गेली. अलीकडेच काही जण मुंबईला पुनर्भेटीसाठी जमले होते, पण स्थळ - काळाच्या अभावी बऱ्याच जणांना कळलंही नव्हतं. फेसबुक च्या कृपेने जुने वर्गमित्र हळू हळू व्हर्च्युअल जगतात भेटायला लागले. मधली वर्षं जणू नव्हतीच असं वाटायला लागलं! गम्मत म्हणजे कॉलेजच्या दिवसात 'काय कसं काय' एवढ्यापुरतीच ओळख असणारे जिवाभावाच्या मित्रांसारखे 'बोलायला' लागले. जगभर विखुरलेल्या वर्गमित्रांना जोडणारा दुवा अर्थातच जी एस मेडिकल कॉलेज! एक दिवस आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या फेसबुक समूहावर उज्वलाताईंच (आता उज्वला दळवी) पण आगमन झालं. फेसबुक वरच्या गप्पांच्या ओघात कळलं की त्यांनी सौदी अरेबिया मधल्या अनुभवांवर पुस्तक लिहिलं आहे. इंटरनेट वर त्याबद्दल माहिती पहात असतांना त्यांच्या इतर लिखाणाच्या लिंक्स सापडल्या.

वाचायला सुरुवात केली आणि एकदम जाणवलं, अभ्यासातल्या आणि डॉक्टरकी मधल्या हुशारीला तोडीस तोड अशी लेखनशैली त्यांच्याकडे आहे. मी लेखक नाही आणि समीक्षकही नाही. तेव्हा साचेबंद वाक्यात मी त्यांच्या लेखनाचं वर्णन मी करणार नाही! मात्र त्यांचं लेखन कुठे सापडेल ते मी सांगेन - 'अंतराळ' ह्या नेट वरच्या मराठी नियतकालिकात. 'अंतराळ' वर आणखी इतर लेखकांच्या कार्याचा पण प्रचंड खजिना आहे. डॉ. उज्वला दळवींच्या लिखाणासाठी, डाव्या बाजूला "सहभाग" लिंक आहे ती क्लिक करा. यादीमध्ये त्यांचं नाव बरंच खाली आहे. ह्या वेबसाईट वर आता "dynamic font" वापरला जातो, पण काही अडचण आल्यास, 'नूतन' नावाचा font मिळवण्यासाठी लिंक आहे.

'पर्दाफाश' आणि 'भाऊचा धक्का' मध्ये त्यांच्या सौदी अरेबियाच्या अनुभवांची झलक मिळेल. 'दिल्या घरी तू' (कथा) आणि 'मावळतीचा मधुचंद्र' (कविता) थेट हृदयाला भिडतील. पण सावधान! इतर काही कवितांच्या शीर्षकांवर जाऊ नका... पण इतर वाचकांचा आनंद मी कशाला हिरावून घेऊ? तुम्हीच वाचा! आणि हो! 'पुनर्भेट' हे त्यांच्या एका कवितेचं शीर्षक सुद्धा आहे.
(त्यांच्या सौदी विषयी पुस्तकाचं नाव आहे ‘सोन्याच्या धुराचे ठसके’.)
डॉ. उज्वला (रेगे) दळवी : अभिनंदन!

Monday, February 13, 2012

ऑस्ट्रेलिया - २.


या आधी : ऑस्ट्रेलिया - १.

मलेशियाला जाण्याआधी मी मुंबईत एका ज्येष्ठ डॉक्टरांना भेटायला गेलो होतो. बोलता बोलता ते म्हणाले, "अरे तिथे कुठे चालला आहात तुम्ही? भ्रष्टाचाराने बरबटलेले देश ते!" त्यांचा रोख आग्नेय आशियातल्या बऱ्याच देशांवर होता असं वाटलं. मी काही प्रतिक्रिया दिली नाही. थोड्याच दिवसात आम्ही मलेशियात कोटा भारू येथे उतरलो. विद्यापीठाने पहिले तीन दिवस एका बऱ्यापैकी हॉटेल मध्ये रहायची सोय केली होती. विद्यापीठाच्या मालकीची घरं होती, त्यातलं एक भाड्याने देऊ केलं होतं. पहिल्या तीन दिवसात, गृहोपयोगी वस्तूंची खरेदी, नोकरीवर रुजू होण्यासाठी आवश्यक ते सोपस्कार ह्यात गेले. फ्रीज, गॅसचा स्टोव्ह आणि वॉशिंग मशीन ह्या अत्यावश्यक वस्तू घेऊन आम्ही घरात राहायला गेलो. थोडी भांडीकुंडी बरोबर नेलीच होती. टेलिफोन कंपनीच्या ऑफिसात जाऊन, पैसे भरून फोन सुरु करून घेतला. हा मलेशियाचा पहिला धक्का. जवळच्याच किराण्याच्या दुकानात गॅसची एजन्सी होती. तिथे जाऊन सिलिंडर आणला - एका सिलिंडरच्या किमतीएवढं डिपोझीट भरून. हा तिथला दुसरा धक्का. लक्षात घ्या, ते १९९४ साल होतं. मुंबई आणि नाशिक चे ह्या बाबतीतले जाज्वल्य अनुभव ताजे होते!


कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने 'कार लोन'ची व्यवस्था केली होती. खरं तर विद्यापीठातली नोकरी ही शुद्ध सरकारी नोकरी होती. शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखालची. तिथे अशी काही सोय असावी हेच नवल होतं. व्याजाचा दर होता ४%. तीन वर्षाच्या कालावधीत संपूर्ण वसुली होईल ह्या बेताने कर्जाची व्यवस्था केलेली असे. त्यानुसार गाडीचं बुकिंग केलं. कोटा भारू मध्ये सार्वजनिक परिवहनाची सोय खास नसल्यामुळे कार असणं आवश्यकही होतं. भारतीय लायसन्स तिथे वैध नव्हतं, आणि माझ्याकडे आंतरराष्ट्रीय परवाना नव्हता. तेव्हा ड्रायव्हिंगचा श्रीगणेशा केला (भारतात चार चाकांचा अनुभव नव्हतं, केवळ 'बुलेट' चालवण्याचा होता). लेखी परीक्षा, मग ड्रायव्हिंग प्रशिक्षक... कालांतराने ड्रायव्हिंग चाचणी झाली, अस्मादिक पास झाले. तिथल्या "आर टी ओ" मध्ये फोटो, पासपोर्ट इ. घेऊन गेलो, त्या अधिकाऱ्याने पाच मिनिटात लायसन्स बनवून दिलं. मलेशियाचा तिसरा धक्का.

परदेशी कर्मचाऱ्यांना तिथे एक इमिग्रेशन टॅक्स भरावा लागे, पण शिक्षण क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना त्यातून माफी मिळायची. त्यासाठी आयकर विभागात जाऊन काही कागदपत्रं करावी लागत. त्या निमित्ताने मी

आयकर कार्यालयात गेलो. संबंधित नमुन्यांवर सह्या करून, योग्य ती इतर कागदपत्रं सदर केली. अधिकारी म्हणाला, "उद्या मी रजेवर आहे, परवा सुट्टी आहे, तेव्हा तुम्ही तीन दिवसांनंतर या. मी मनात म्हटलं 'चला, शेवटी बाबूगिरीचा दणका मिळणार तर'. तीन दिवसांनी ऑफिस मध्ये पुन्हा गेलो. रिसेप्शनला एक महिला कर्मचारी होती. म्हणाली, 'ते अधिकारी आज हॉस्पिटल मध्ये गेले आहेत...'. मी, मनात : 'ह्म्म्म... आता काय...?'. तेवढ्यात ती म्हणाली 'थांबा! तुमचं नाव अविनाश आहे का?... हे घ्या तुमचं पत्र तयार आहे' असं म्हणत तिने एक लिफाफा दिला, त्यात माझं 'tax exemption' चं पत्र होतं. मलेशियाचा आणखी एक धक्का.

मला राहून राहून वाटायचं, हा विकसनशील देश आहे. इथे पण बऱ्यापैकी गरिबी आहे. गरीब-श्रीमंत ह्यात दरी आहे. तरी इथे मूलभूत सुविधा इतक्या सहज मिळतात. पावलोपावली मनधरण्या, लाचलुचपत हे करावा लागत नाही.

मलेशिया वर्षभर पाऊस पडणारा देश. तरीही इथले रस्ते उत्तम. बहुतेक सरकारी कार्यालयात वातावरण प्रसन्न, शांत आणि वातानुकूलित. रस्त्यावर वाहतुकीचा कधी खोळंबा झाला तर कर्णकर्कश हॉर्न्सचा वाद्यवृंद नाही... किंबहुना, मुंबई-पुण्यात किंवा नाशिकला एका तासात जितक्या वेळा हॉर्न वाजवला जातो तितक्या वेळा मलेशियामध्ये तीन वर्षात वाजवला नव्हता. १९९७ च्या 'सोरॉसनिर्मित' आर्थिक संकटाच्या वेळी मलेशियावर पण परिणाम झाला, पण कोरिया किंवा थायलंड प्रमाणे वाताहात झाली नाही. हे अर्थातच माझं, वैयक्तिक अनुभवावर आधारलेलं मत आहे. थोडीफार महागाई झाली, हॉटेल सारख्या व्यवसायांवर परिणाम झाला, पण दैनंदिन आयुष्यात फारसा परिणाम जाणवला नाही.

एका वर्षानंतर आणि पुन्हा तीन वर्षांनंतर भारतात आलो तेव्हा पुनश्च धक्के बसायची वेळ आली. १९९७ पर्यंत भारतात 'लिबरलायझेशन' , 'ग्लोबलायझेशन' चे वारे जोरदार होते. GDP, GNP, वगैरे मला समजत नाही. मला जे जाणवलं ते असं, कि वस्तूंच्या किमती डॉलर मध्ये असाव्यात तशा वाटल्या, पण सर्वसामान्य माणसाचं उत्पन्न त्या प्रमाणात वाढलेलं दिसलं नाही. मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांना त्या दिवसात जो पगार होता तो वाढत्या किमतींच्या प्रमाणात पुरेसा नव्हता हे त्यावेळचं माझं निरीक्षण. खाजगी शिकवण्या करून पगारापेक्षा जास्त पैसे मिळतात हेही ऐकून होतो. (हा कोणावर आरोप नाही, आणि सरसकट विधानही (stereotyping) नाही. गैरसमज नसावा!). पण ते माझ्या स्वभावात बसणं शक्य नव्हतं.

पुढच्या तीन-चार फेऱ्यांमध्ये आणखी बरेच अनुभव आले. पुण्यात एका निमसरकारी ऑफिसात चक्क खुर्चीवरच्या कारकुनाने सांगितलं, 'ते बाहेर बसलेले आहेत ना (म्हणजे दलाल), त्यांच्याकडे जा, ते समजावून सांगतील काय करायचं'.

दरम्यान आम्ही 'योगायोगाने' ऑस्ट्रेलियात पोहोचलो होतो. कायम वास्तव्याचा (PR , अमेरिकन ग्रीन कार्ड प्रमाणे) व्हिसा मिळाल्यावर कर्जावर घर घेतलं. घर जुनं होतं आणि आम्हाला एक खोली वाढवायची गरज होती. त्यासाठी लायसंस्ड इंजिनियर कडून प्लान प्रमाणित करून घेतलं आणि म्युनिसिपल ऑफिस मध्ये गेलो. तिथे प्लानिंग ऑफिसर ने सांगितलं की तुमचं प्लान नियमात बसत नाही, खोलीची लांबी थोडी कमी करा. ते करून पुन्हा ऑफिस मध्ये गेलो. त्या अधिकाऱ्याने मोजमाप केलं आणि म्हणाला, 'हे ठीक आहे, चार दिवसात बांधकामाचा परवाना तुम्हाला पोस्टाने मिळेल'. ड्रायव्हिंग लायसन्स साठी तेच. मलेशियन लायसन्स असल्याने (त्यावेळच्या नियमाप्रमाणे) फक्त लेखी चाचणीची आवश्यकता होती. ती चाचणी कम्प्युटरवर झाली. बाहेरच्या अधिकाऱ्याने कम्प्युटरवर आलेला निकाल पाहिला. म्हणाला, 'ठीक आहे, पैसे भरा, आठ दिवसांच्या आत लायसन्स पोस्टाने मिळेल'. आयकराचा 'रिफंड' आठ दिवसाच्या आत बँकेत जमा होतो. आरोग्यव्यवस्था नियमानुसार चालते. फॅमिली फ़िजिशिअनच्या 'रेफरन्स' शिवाय रक्त, लघवी, एक्स रे इत्यादी चाचण्या होत नाहीत, स्पेशालिस्ट ची अपोईण्टमेन्ट मिळत नाही आणि त्याच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय तशी औषधं मिळत नाहीत. इथे सुद्धा आरोग्य सेवेमध्ये टीका करायला जागा आहे, नाही असं नाही. पण सर्वसाधारणपणे प्रॅक्टिस स्वच्छ असते, त्रुटी असल्याच तर त्या बहुतकरून ‘सिस्टिम’च्या असतात.

अलीकडच्या काळातले भारतातले अनुभव...? एका भेटीत antibiotic घ्यायची वेळ आली (मी सहसा घेत नाही!). केमिस्टकडे जाऊन मागितलं, आणि पूर्वीच्या सवयीने माझं नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर सांगितले (स्वतः डॉक्टर आहे, सेल्फ-प्रिस्क्रिप्शन म्हणून). तो म्हणाला, “कशाला? अहो तुम्ही सरळ आहात, ठीक आहे. पण मी सगळी रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवली, तरी तो इन्स्पेक्टर येणार, ५००० घेणार, कपाट उघडून किमती डीओडोरंट उचलून जाणार. सरळ काम करून हे बदलणार नाही.”

भारतातल्या मित्रांशी बोलतांना "हे सगळं बदलेल - सुरुवात झाली आहे" हे वाक्य अनेक वेळा ऐकायला मिळतं. चाळीस वर्षांपूर्वी पण मी हे ऐकलं होतं. तीस वर्षांपूर्वी, राहत्या घराचं मिळकत करासाठी मोजमाप व्हायचं होतं. एक शेजारी मला म्हणाला, प्रत्येक सदनिकेमागे ५० रुपये द्यायचे असं ठरलं आहे, तो अधिकारी क्षेत्रफळ कमी दाखवेल. मी म्हटलं, मला क्षेत्रफळ कमी करून नको आहे, आहे तेवढ्याच कर मी भरायला तयार आहे. त्या संबंधात माझ्या एका मित्राचं भाष्य : "तू सरळ असशील तर 'घेऊ' नको, पण तुला 'द्यायला' लागेलच". अलीकडे एके ठिकाणी ऐकलं की नगरपालिकेत बिल्डींग किंवा वाढीव बांधकामाच्या प्रस्तावाचा 'रेट' ७००० आहे. परवानगी साठी लोक म्हणे कार्यालयात जात नाहीत, स्थानिक नगरसेवकाकडे जातात.

मला कधी कधी प्रश्न पडतो, ह्यातले किती जण "मी अण्णा आहे" च्या टोप्या घालून फिरत होते? मोठ्या घोटाळ्यांचे आकडे मोठे दिसतात, पण ह्या छोट्या छोट्या आकड्यांची बेरीज कोणी केली आहे का?

कधी असंही वाटतं, तिथे राहून ह्या गोष्टींची सवय होते. सरळ माणसांनाही जगता येतं, थोडंफार चरफडून का होईना! माझ्या मित्रपरिवारातले सर्वच 'सरळ' आहेत! ते नाही का रहात? गेल्या महिन्यात, नाशिकला दोनचार वेळा रिक्षावाल्यांशी हुज्जत घातल्यावर दुसऱ्या दिवशी काही वाटेनासं झालं! पण दीर्घकाळ हे सहन करायची ताकद आता उरली नाही. जातीय राजकारण आणि त्यातून उद्भवलेल्या समस्या मिटण्यापलीकडे गेल्या आहेत असं वाटायला लागलं आहे. ऑर्कुटवरच्या समूहांमध्ये, नियंत्रकांनी कितीही अंकुश वापरले तरी जी वादावादी होते त्यातून आणखी काय दिसतं? मी मागे म्हटल्याप्रमाणे, मी ऑस्ट्रेलियाला 'ठरवून' आलो नाही, योगायोगाने पोहोचलो. पण आता कायम परत येण्याबद्दल विचारलं कोणी तर त्याचं उत्तर खेदपूर्वक "नाही" असंच द्यावं लागेल.

मग प्रश्न उभे राहतात ते असे : "जन्मभूमीची ओढ वाटते का नाही?"; "जन्मभूमीचा अभिमान वाटतो का नाही?" "आपली संस्कृती आवडते की नाही?" सर्व प्रश्नांची उत्तरं "हो" अशीच आहेत, पण त्यामागे आणखी बरीच मोठी भूमिका आहे. त्याबद्दल नंतर, लवकरच!

************************