माझे आई-वडील श्रीकृष्णनगरात रहायला आले ते वर्ष होतं १९५२. नक्की महिना कोणता होता माहीत नाही, पण तेव्हा कॉलनीचं वय साधारण ३ वर्षं असावं, आणि माझं वय होतं काही महिने! सुरुवातीच्या आठवणी अर्थातच आठवणी नाहीत, ऐकीव आहेत.
कॉलनीमध्ये तेव्हा अक्षरशः हाताच्या बोटावर मोजण्याइतकी घरं होती. त्यावर्षीचा एक बोलका फोटो माझ्या आल्बम मध्ये आहे. त्या फोटोतला परिसर दहा-बारा वर्षात बदलला, आणि आता तर कल्पनातीत आहे. आम्ही तेव्हा "कुळकर्ण्यांच्या घरात" रहात होतो. म्हणजे, माझ्या समजुतीप्रमाणे, प्लॉट क्र. ८७. मार्च १९५३ मध्ये सीता निवास (१११) बांधलं गेलं आणि लवकरच आम्ही तिथे बिऱ्हाड हलवलं. १९५६ च्या सुमारास माझे आजी-आजोबा आणि मामा (प्रधान) कॉलनीत रहायला आले. तेव्हा ते पाटकरांच्या घरात रहात. म्हणजे प्लॉट क्र. ७८, 'मंगल धाम'. हे सारं तपशीलवार सांगायचं कारण असं की सुरुवातीच्या आठवणी ह्या दोन जागांशी निगडीत आहेत. आणि अगदी पहिल्या आठवणी १९५६-५७ च्या सुमाराच्या आहेत. तेव्हा आजीकडे जायचं असलं तर शॉर्टकट होता. १११ (सीता निवास) मधून निघालं की डावीकडे... शेजारची तीन घरं नव्हतीच. १०७ (दणाईत, डॉ. देशपांडे) मध्ये मोठी बाग होती - कुळकर्ण्यांची बाग. पुढे प्लॉट क्र. ३९/४० मधल्या झुडुपातून वाट काढत, आंब्याच्या मोठ्या झाडाखालून पलीकडे, ५८ किंवा ५९ मधून पुढे. श्रीकृष्ण हायस्कूल ची मोठी इमारत नव्हती - खरं वाटत नाही ना? हळू हळू घरांची संख्या वाढत गेली, तशी ती वाट बंद झाली.
कॉलनीच्या हॉलच्या आजूबाजूला काहीही नाही! माळरान (कदाचित शेतजमीन असेल, आठवत नाही), थेट दहिसर पर्यंत वस्ती नाही, काही ‘पाडे' सोडून. मागे काजूपाड्यात 'वरच्या कॉलनीच्या मागे थोडीफार घरं, बाकी शाळेच्या मैदानाच्या आसपास चार झोपड्या. अभिनव नगर त्यावेळी 'प्रपोजल' च्या अवस्थेत सुद्धा नसेल. मोकळं मैदान, ताडाची उंच उंच झाडं, आणि बरीचशी आंब्याची झाडं. ती आंब्याची झाडं कोणाच्या मालकीची होती माहीत नाही, पण एकदा आम्ही मुलं कैऱ्या पाडत असतांना एक प्रचंड आकाराचा रखवालदार लांबलचक काठी घेऊन आमच्या मागे लागलेला आठवतो! कधी कोणी आगरी ताडाच्या झाडावर चढून ताडगोळे तोडून आणी, आणि जवळच सोलून ताजे ताजे विकायला बसे. दीड-दोन आण्याचे एक डझन.
अभिनव नगरच्या डोंगराच्या टोकाला (आता तिथल्या शाळेचं मागचं गेट आहे त्याच्या जवळ) राष्ट्रीय उद्यानाचे दोन बंगले - हॉलिडे कॉटेजेस - असत. तिथून दगडाधोंड्यांच्या वाटेने खाली उतरलं की सरळ सती बागेचा रस्ता. बाकी लायन सफारी नाही, की वनराणी नाही. आणि राष्ट्रीय उद्यान म्हणजे केवळ नॅशनल पार्क किंवा नुसता 'पार्क' होता. त्याचं अधिकृत नाव होतं 'कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान' – त्याच्या कुशीत वसलेलं श्रीकृष्णनगर, जिथे सगळं श्रीकृष्णमय होतं! श्रीकृष्ण विद्यालय होतं, श्रीकृष्णाचं देऊळ होतं, आणि थोड्याशाच घरांमध्ये, पण भरपूर मुलं होती!
आख्खी कॉलनीच बोरिवली मध्ये एकाकी पडल्यासारखी वस्ती होती तेव्हा! पश्चिमेकडची स्टेशन जवळची वस्ती, पूर्व बाजूचं दौलत नगर, कस्तुरबा रोड, दत्तपाडा ह्यांच्या मानाने अंतर बरंच जास्त वाटायचं. स्टेशन पण आताच्या मानाने खूप लहान - इन मीन तीन प्लॅटफॉर्म! एक आणि दोन वर बोरिवली लोकल थांबायच्या. तीन नंबर वर विरार कडे जाणाऱ्या आणि विरारहून येणाऱ्या गाड्या. बाहेरगावच्या गाड्या पण तीन नंबरवर. ४ आणि ५ नंबरचे पण बरेच नंतर झाले.
रिक्षा...? J भलतंच काय! बोरिवली तेव्हा ठाणे जिल्ह्यात होती - मुंबईची हद्द जोगेश्वरीला असायची. स्टेशनच्या बाहेर टांगे उभे असायचे. टांग्याचे आठ आणे (म्हणजे नंतरचे ५० पैसे!) फार वाटायचे. चार-दोन खाजगी गाड्या टॅक्सी म्हणून चालून जायच्या. आम आदमी "तेज चल!... एक दो ... एक दो..." करत जायचा. बोरिवली मुंबईमध्ये आल्यावर सुद्धा टॅक्सी तिथे यायला काही वर्षं जावी लागली, आणि रिक्षा तर आमच्यासाठी "अलीकडची गोष्ट" आहे. मुख्य रस्ता (म. गांधी रस्ता) आजच्या मानाने १/४ रुंदीचा असावा. पण रात्री ८ नंतर निर्मनुष्य वाटायचा. स्टेशन जवळ एक-दोन चहाची दुकानं - त्यांना 'हॉटेल' म्हणणं म्हणजे विनोद, पण त्यांच्या नावात मात्र 'होटल' असायचं. मात्र राऊत यांचं ‘वेस्टर्न हेअर कटिंग सलून’ हा एक विशेष 'landmark' होता! पुढे हेमराज हायस्कूल आणि रस्त्याच्या कडेच्या 'वाड्या' सोडल्यास बाकी शून्य. हेमराज हायस्कूल च्या पूर्वेला (रस्त्याच्या उत्तरेला) शेतं आणि भाजीचे मळे. ओंकारेश्वर मंदिर पण नंतर आलं (त्याचं बांधकाम सुरु असलेलं मला चांगलंच आठवतंय). वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे तर नव्हताच. रस्ता वळून सरळ श्रीकृष्ण नगरकडे उतारावरून जायचा. रस्त्याच्या बाजूला गोठे - पंडित रामकृपाल अर्जुन तिवारी यांचं श्रीकृष्ण डेअरी फार्म होतं ते! पंडित तिवारी म्हणजे एक खास व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याबद्दल नंतर लिहू. (ते दिवस भय्यांचा द्वेष करण्याचे नव्हते! J)
नदीवरचा पूल होता अर्ध्या रुंदीचा आणि कमी उंच. खूप वर्षांनंतर, बेस्ट बस सुरु झाली तेव्हा नवा (सध्याचा) पूल झाला. नदीच्या पात्रात तेव्हा अनेक विहिरी होत्या. जास्त खोल नसल्या तरी नदीपात्रात असल्याने त्यात बहुधा बारा महिने पाणी असायचं. गोठेवाले भय्ये नदीवर म्हशींना 'आंघोळ' घालायला आणायचे. सगळ्या म्हशी पुलाजवळ रस्ता ओलांडून नदीकडे जात. सर्वसाधारणपणे त्या आपल्याच नादात संथपणे जात, पण कधी उधळल्या तर रस्त्यावरच्या लोकांची त्रेधातिरपीट उडे.
दहिसर नदीला तेव्हा कचरापेटीचं रूप नव्हतं. पावसाळ्यात पूर आला तरी कॉलनीच्या रस्त्यावर पाणी जास्त येत नसे. आणि पूर तर दर पावसाळ्यात हमखास यायचा. पाणी वाढलं कि आधी पात्रातल्या विहिरी दिसेनाशा व्हायच्या. आणखी चार सहा फूट वाढलं कि कॉलनीत कुजबूज सुरु व्हायची. मग मुलं (आणि हो, मोठी माणसं सुद्धा) 'पूर' बघायला पुलाजवळ गोळा व्हायची. दर पावसाळ्यात किमान एकदा पाणी इतकं वाढत असे कि पूल पूर्ण पाण्याखाली. (तो पूल आताच्या पुलापेक्षा थोडा कमी उंच होतं हे लक्षात घ्या!). हायवे नव्हता आणि म्हणून हायवेचा पूलही नव्हता. त्यामुळे पुलावरून पाणी गेलं कि श्रीकृष्णनगराचा बाहेरच्या जगाशी संपर्क पूर्ण तुटून जाई. मुंबईतल्या ऑफिसेसला जाणाऱ्यांना त्या दिवशी सक्तीची सुट्टी मिळे. ऑफिसला फोन करण्याचीही सोय नसे. १९६०-६५ च्या दरम्यान सगळ्या कॉलनीत मिळून पाच-सात घरात फोन असावेत. ते सुद्धा पावसात बंद असण्याचीच शक्यता जास्त!
बोरिवलीमधलं एकुलतं एक पोस्ट ऑफिस तेव्हा पश्चिमेला होतं. बोरिवलीचा समावेश मुंबईत झाला तेव्हा संपूर्ण बोरिवली "मुंबई ६६" होती. पूर्वेला पोस्ट ऑफिस झाल्यावर मग ९२ आणि ६६ अशी विभागणी झाली. कस्तुरबा रोड वर जास्त करून भाजीवाले इत्यादी असत, आणि थोडीफार दुकानं. मोठी खरेदी बहुतेक पश्चिमेला. मोठी मंडई पश्चिमेला... नाही, आता आहे तिथे नाही! दौलत नगर रेल्वे फाटक आणि स्टेशन यांच्या मधल्या जागेत, कौलारू मंडई होती ती! कच्च्या जमिनीच्या जागेत, जमिनीवर चिकचिकाट अशी खास मंडई होती ती! भाज्या, फळांचे ठेले... एका बाजूला मटन आणि मासळीचा विभाग... असं काम होतं तिथे. त्यावेळी "बोरिवली वेस्ट" म्हणायची पद्धत नव्हती! रेल्वे लाईन ओलांडून जायचं म्हणजे "पलीकडे जायचं". 'पलीकडे' घोडबंदर रोड (तेव्हा तो एस व्ही रोड नव्हता!) होता एवढासा - आणि तरी मोकळा मोकळा. स्टेशन च्या समोर छोट्या छोट्या इमारतींमध्ये कोर्ट आणि पोलीस स्टेशन, मधल्या जागेत डॉ बागवे यांचं हॉस्पिटल. छोट्याशा बैठ्या इमारतीत, रस्त्याला लागून भांडारकरांच दुकान आणि शेजारीच डॉ कुळकर्णी यांचा दवाखाना. थोडं पुढे (दक्षिणेकडे) गेलं की डॉ पालकरांचा दवाखाना, मग डॉ हिंदळेकर आणि डॉ करोडे. हे इथे लिहायचा उद्देश असा, कि एक डॉ नाईक (कस्तुरबा रोड) सोडले तर बोरिवली पूर्वेत डॉक्टर नव्हते! पण त्याबद्दल नंतर!
पश्चिमेला गोराईकडे जाणारा टिळक रोड. त्याच्यावर बाभई आणि वझिरा म्हणजे छोटीशी गावठाण. दूर अंतरावर एकसर, शिंपोली सारखी छोटी गावं. तिथे कुठे जायचं म्हणजे परगावी गेल्यासारखं वाटे. मंडपेश्वरच्या गुंफा आणि त्यापलीकडे सेंट फ्रान्सिस द'असिसी शाळा आणि चर्च, किंवा दक्षिणेला पोयसरचं चर्च आणि मेरी इमाक्युलेट शाळा म्हणजे तर एक वेगळीच दुनिया. बाकी बोरिवली पश्चिम म्हणजे छोट्या छोट्या वाड्या...
कापडचोपड, सणासुदीची खरेदी, हे सगळं तर बोरिवलीमध्ये जवळ जवळ होतच नसे. श्रीकृष्णनगरात रहायला येणाऱ्या बऱ्याच जणांचं 'मुंबई कनेक्शन' असायचं - बरेच अर्थातच नवीनच मुंबईत आलेले असायचे. पण मध्यमवर्गीय मराठी व्यक्तींना दादर-गिरगावचं प्रेम तर असणारच!
तर अशा बोरिवली मधलं, असं श्रीकृष्ण नगर - मुंबईत असूनही मुंबईत नसलेलं.
******************************
2 comments:
माझी एक मावशी, श्रीमती शालिनी रेगे तुझ्या शाळेत शिक्षिका होती. तिचा तू अतिशय लाडका विद्यार्थी होतास. तिच्या धाकट्या भावाच्या लग्नासाठी आम्ही एक दिवस बोरिवलीला रहायला आलो होतो. त्या काळात माहीममध्ये नारळीच्या बागा होत्या, विलेपार्ल्यात लंबीचौडी शेतं होती. आणि तरीही बोरिवलीची झाडी, तिच्यातल्या पाचोळ्याने भरलेल्या पांदी, त्यांच्या बाजूची कोरांटीची झुडपं हे सारं मोठ्या नवलाईचं वाटलं होतं मला. काही ठिकाणची झाडी तर ‘रान’ हे नामाभिधान मिरवण्याइतकी घनदाट होती. आज तुझ्या शब्दचित्रातून श्रीकृष्णनगर बघताना त्या आठवणी जाग्या झाल्या.
-उज्ज्वला.
shrikrishna nagar samor ubhe ahe asech vatle dhanyvad
sham gore
Post a Comment