Wednesday, August 3, 2011

अवि-स्मरणीय : चार मित्र : भाग २

२.


ही जोडगोळी... ह्यांच्याबद्दल वेगवेगळं लिहिणं कठीण आहे. खरं तर दोन्ही वेगळी व्यक्तिमत्व. एका वर्गातले, शाळा संपल्यावर कॉलेजमध्ये सारखंच शिक्षण घेतलेले... जवळ जवळ राहणारे. नेहमी बरोबर दिसणारे... तरीही वेगळे. आणि दोघेही माझे इतके प्रिय मित्र की त्यांचा उल्लेख बरोबरच होतो. माझ्यातला शिक्षक खर्या अर्थाने 'जागा' केला तो ह्या दोघांनी. हे आजपर्यंत मी त्यांनाही सांगितलं नसेल! त्यांना सांगितलं तर त्यांनाही आश्चर्य वाटेल. पण ते खरं आहे. आज मागे वळून पाहतांना हे खूप प्रकर्षाने जाणवतंय.

ओळख मूळची शाळेतलीच, पण दोघेही माझे वर्गबंधू नव्हते. आता श्रीकृष्णनगरात राहणारे म्हणजे जवळ काय आणि लांब काय...! गम्मत म्हणजे शाळेपासून जवळ जवळ मैत्री म्हणण्यासारखी ओळख असूनही, खरी मैत्री 'सुरु' झाली ती मी मेडिकल कॉलेजला गेल्यावर. आमच्या गप्पा कुठल्या विषयावरून सुरु झाल्या हे आज आठवणं कठीण आहे. एक निश्चित... गप्पातून गप्पा निघत जायच्या. बहुधा रात्री जेवणानंतर... कॉलनीत मधल्या एका चौरस्त्यावर. मग दहा वाजायचे... कधी अकरा, साडेअकरा... गप्पा सुरूच असायच्या. कोणी म्हणेल, "त्यात विशेष ते काय! त्यालाच आम्ही आजकाल 'कट्टा' म्हणतो". पण तेव्हा 'कट्टा' ही संकल्पना नव्हती!. नवी - जुनी गाणी, थोडंफार इतर संगीत, त्यावेळी येऊ घातलेला "मेरा नाम जोकर"... हे सगळं गप्पांमध्ये असायचंच. पण मग मध्येच विषयाला कलाटणी मिळायची. "अवि, तो हार्ट अटॅक येतो म्हणजे नक्की काय रे?" आता हे दोघे कॉमर्सचे विद्यार्थी. हे मेडिकल प्रश्न... त्यांना समजतील अशी पण तरीही शास्त्रीय दृष्ट्या बिनचूक अशी उत्तरं देणं म्हणजे जरा बिकटच. कधी इंग्रजी, कधी मराठी अशी कसरत करत, असे अनेक प्रश्न सोडवण्याची सवय तिथे झाली.

पण मैत्री ही अशा वरवर का होईना, रुक्ष वाटणाऱ्या चर्चांवर कुठे जमते! तरीही, त्या चर्चांमधून दुवे सांधले जात होते, एकमेकांचे स्वभाव समजले जात होते... परीक्षा झाल्या, पदव्या मिळाल्या, नोकरी व्यवसाय सुरु झाले, संसार सुरु झाले... भेटीगाठी थोड्या कमी झाल्या असतील... मैत्रीवर कधी कार्ड पाठवून शिक्कामोर्तब करायला लागत नव्हतं... "मैत्री दिवस"ही पाळले जात नव्हते तेव्हा! परगावाहून येऊन अवेळी फोन करून 'रात्री रहायला येतो' म्हणता येत होतं... आणि परदेशी गेल्यावर तर श्रीकृष्णनगरात येऊन भेट झाली नाही हे शक्यच नव्हतं! मग आठवणींचं पारायण - त्या गप्पा, गणेशोत्सवातला तो कार्यक्रम (सुहासच्या गाण्याचा), अमीर खां च्या गाण्याच्या आठवणी, पुण्याची मोटर सायकल वरची ती फेमस ट्रिप... सर्वात महत्वाचं म्हणजे आयुष्याच्या उंचसखल वाटेवर अनेक प्रकारच्या प्रसंगात मित्रांनी दिलेली साथ...

ह्यावर्षीच्या भारत भेटीत बोरिवलीचा योग नव्हता. पण ह्यावर्षी ह्या दोन मित्रांचा आवर्जून उल्लेख करायला खास कारण आहे. शिक्षक म्हणून विद्यापीठाने दिलेल्या पारितोषिकात अनेकांचा वाटा आहे. मी व्यवसायाने शिक्षक झालो १९७६ साली, पण त्या कलेची खरी उपासना कळत नकळत ह्या दोन मित्रांपासून सुरु झाली होती. कदाचित, डॉक्टर होऊन शिक्षकी पेशा पत्करण्याच्या मुळाशी, त्या रात्री-रात्रीच्या गप्पा, हे दोन मित्र आणि त्यांचे वैद्यकीय प्रश्न असतील... नव्हे, त्यांचा मोठाच सहभाग होता अशी मनोमनी खात्री वाटते...

मित्रांनो, ह्या बक्षिसावर नाव तुमचं, आणि श्रीकृष्ण नगरच्या त्या चौरस्त्याचं!

*******************

No comments: