श्रीकृष्ण नगरातल्या ह्या चार मित्रांमध्ये क्रमवारी नाही! मैत्री कधी, कुठे आणि कशी सुरु होते हे अचूक सांगणं बरेचदा कठीण असतं. ओळख बरीच आधीपासून असते, नकळत कधीतरी आपण मैत्री ह्या अवस्थेला पोहोचतो. ती पुढे जास्त जास्त दृढ होत जाते. इथे दिसणारी क्रमवारी कालमानाप्रमाणे लावली आहे. आणि कालमानाप्रमाणे असं व्हावं हे केवळ विधिलिखित!
१.
१९६४ साली, आठवी पास झाल्यावर मी श्रीकृष्ण हायस्कूल सोडलं. (ती एक आणखी वेगळीच गोष्ट आहे, त्याबद्दल नंतर!). मी शाळेतून 'दाखला' घेऊन बाहेर पडत होतो. त्याच वेळी एक मुलगा शाळेत प्रवेश घेण्यासाठी ऑफिसच्या पायऱ्या चढत होता. मी नववीत दुसरीकडे चाललो होतो, हा आठवीत श्रीकृष्ण हायस्कूल मध्ये शिरत होता. त्यावेळी आमचं काही बोलणं झालं होतं की नाही तेही आठवत नाही. तो नवीनच राहायला आला होता काजूपाड्यामध्ये. तेव्हाचा काजूपाडा म्हणजे श्रीकृष्णनगरचाच भाग म्हणायचा. मोजकीच घरं... जाण्यायेण्याचा रस्ता कॉलनीतूनच. किंबहुना, सांस्कृतिक आणि व्यावहारिक दृष्टीने, श्रीकृष्णनगराचा अविभाज्य भागच! असो. तर, काही महिन्यातच आमची पुन्हा भेट झाली. बोलता बोलता विषय निघाला "क्रिस्टल रेडिओ" करण्याचा. योगायोगाने त्याच वर्षी, मी पण त्याच उद्योगामध्ये होतो.
आजच्या मोबाईल फोन, इंटिग्रेटेड सर्किट इत्यादी च्या जमान्यात, क्रिस्टल रेडिओ मधलं 'थ्रिल' सांगणं कठीण आहे - बॅटरी शिवाय चालणारा, हेडफोन मधून आवाज येणारा, फक्त मुंबई अ आणि ब एवढी स्टेशनं ऐकवणारा... त्याचा छोटासा डायोड आणायला लॅमिंग्टन रोड (दादासाहेब भडकमकर मार्ग) जावं लागायचं.
हळू हळू ओळख वाढत गेली. शाळेतल्या विज्ञान विषयाच्या गप्पा होत राहिल्या. ओळखीची मैत्री कधी झाली, आणि मैत्री 'मुरत' कशी गेली कळलं सुद्धा नाही. मोहन रावराणे जिवलग मित्र झाला... शाळेच्या त्या वर्षांमध्ये मोहन चतुरस्र होता. भाषा, शास्त्र विषयात तर उत्तम होताच, पण तो उत्तम चित्रकारसुद्धा होता. आज हे श्रीकृष्णनगर समूहावर सांगणं म्हणजे वेडेपणाच आहे, पण तेव्हा ही अतिशय खास गोष्ट होती! अभ्यासात हुशार असलेल्या मुलाने कॉलेज मध्ये सायन्सला जायला पाहिजे अशी एक तेव्हाची ठाम समजूत!
त्याप्रमाणे, बरेच सल्ले ऐकून मोहन पण गेला. बहुधा त्याचं मन रमत नव्हतं. राहून राहून त्याच्यातला कलाकार उचल खात होता. सांगायला म्हणून त्याने सायन्सच्या प्रयोगशाळेत दमायला होतं हे कारण पुढे केलं (असं आपलं मला वाटतं!). नेहमीप्रमाणे मनातलं बोलायला माझ्याकडे. आता, वयाने बरोबरचा मित्र एवढ्या मोठ्या प्रश्नावर काय बोलणार? मी एवढंच म्हटलं, 'तू 'आर्ट' ला गेलास तरी स्टुडीओ मध्ये तासनतास उभा राहणारच ना? पण तरी, तुझ्या मनाला पटेल तेच तू कर.'
मोहन आर्टला गेला... घोडदौडीच्या वेगाने प्रगती करत गेला... बक्षिसामागून बक्षिसं मिळवत गेला. कॉलनीत शिकवण्या करून स्वतःच्या शिक्षणाची सोय करत गेला. ह्यामध्ये गुपित काही नाही, आजही कॉलनीत मोहनला 'सर' म्हणणारे आहेत! मी पहात राहिलो... प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, अंतर्मनाला पटेल तेच पूर्ण भक्तिभावाने करणारा मोहन... मोहनचं आयुष्य म्हणजे 'उपासना' शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी आदर्श उदाहरण. काही काळ एका कॉलेज मध्ये शिक्षकाची नोकरी करून मोहनने आणखी एक धाडसी निर्णय घेतला. स्वतःचा व्यवसाय करण्याचा. आज कदाचित कोणाला त्यात विशेष वाटणार नाही - तो काळ वेगळा होता. काहीही पाठबळ नसताना, मध्यमवर्गीय मराठी मुलगा, एका वेगळ्याच क्षेत्रात व्यावसायिक होण्याची स्वप्नं पहात होता. नुसतीच स्वप्नं पहात नव्हता, ती साकार करायला सर्व शक्ती पणाला लावत होता. व्यवसायाला नाव पण काय अनुरूप ठेवलं होतं - 'व्याध'. हातात धनुष्यबाण घेऊन, नजर लक्ष्यावर ठेवून मोहनमधला व्याध निघाला होता.
औषध कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेच्या जगात मोहन उतरला होता. बरेचदा मी प्रभादेवीला त्याच्या स्टुडीओमध्ये भेटायला जात असे. व्यावसायिक मोहन म्हणजे वेगळंच व्यक्तिमत्व होतं! त्याची उंची, बोलण्यातला आत्मविश्वास, हाताखाली काम करणारे ज्युनियर्स... त्याचे बहुसंख्य clients औषध उद्योग जगतातले होते. त्या अनुषंगाने त्याची औषधांची माहिती कौतुकास्पद होती. पुढे मोहनने मोठा मामिया कॅमेरा घेतला. त्या काळाच्या फ्लॅश परावर्तन करण्यासाठी लावलेल्या 'छत्र्या', तो खास कॅमेरा आणि त्याच्यामागे उभा मोहन - आमच्या मैत्रीच्या सुरुवातीच्या काळात मी त्याला सत्यजित राय यांचा एक फोटो दाखवला होता. आता मला त्या फोटोची आठवण यायला लागली! कोणी म्हणेल, काय मित्राची स्तुती चालली आहे! पण प्रत्येक उदाहरण त्याच्या विशिष्ट संदर्भचौकटीत पाहिलं की ते किती चपखल बसतं ते लक्षात येईल!
आमची मैत्री कुठल्या आधारावर एवढी भक्कम उभी होती (आणि आहे!) हे सांगणं सोपं नाही. एवढं निश्चित, की आपल्या अंतर्मनाच्या हाकेला खंबीरपणे साद देणं, त्यासाठी पडेल ते कष्ट करणं (being loyal to one's inner convictions) हे मी मोहनकडून शिकलो. त्याहीपुढे, कोणत्याही किचकट प्रश्नाच्या दोन्ही बाजू समजून घेणं, प्रामाणिकपणे विचार करून, वेळ पडल्यास अप्रिय वाटण्याची शक्यता असली तरी सडेतोड मत आणि सल्ला देणं... हे मोहनचं खास वैशिष्ट्य. बोलण्याची तऱ्हा मुळातच मृदू... माझ्या व्यक्तिगत आशा बिकट प्रसंगी मोहनचे हे गुण प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे आजही 'अवि, हे तुझं चुकलं' असं मोहनने म्हटलं तरी ते प्रियच असतं!
माझं परदेशी वास्तव्य झाल्यापासून (म्हणजे १९९४ पासून!) आमच्या भेटी कमी झाल्या. एरवी पत्रं लिहिणं ही माझी खासियत होती, तीही नंतर कमी कमी होत गेली. इ-मेल वर मोहन खरं तर कमीच भेटतो! (आता फेसबुक वर भेटायला लागला आहे!) पण दर वर्षी जून महिन्यात दोघांना ती पहिली भेट आठवते... मी दाखला घेऊन बाहेर पडत होतो आणि मोहन शाळेत प्रवेश घ्यायला शिरत होता...
दर जून महिन्यात आम्ही मैत्रीचा आणखी एक वाढदिवस झाला असं एकमेकांना सांगतो.
******************
1 comment:
मोहन रावराणेची यशोगाथा आणि सुधीर वाघचा मनाला चटका लावणारा अंत हे दोन्ही भाग तर मनाला भिडलेच पण कसलाही बाऊ न करता केवळ त्या बक्षिसावरची दोन्ही नावं गुलदस्तात ठेवल्यामुळे त्या दोघांशी असलेल्या मैत्रीचं गहिरेपण अधिक खाजगी, जिवलग झालं आहे. ते खरंच तसं, मोहन आणि सुधीरपेक्षा अधिक जवळचं होतं का?
-उज्ज्वला.
Post a Comment