Wednesday, August 3, 2011

अवि-स्मरणीय : चार मित्र : भाग ३

३.


मला वाटतं श्रीकृष्ण हायस्कूलची ती SSC ची पहिली बॅच. पण माझी त्याची शाळेत ओळख जेमतेमच होती. तो शांत स्वभावाचा, उगीच पुढे न येणारा... त्यात मी त्याच्या ३ वर्षं मागे. रस्त्यात कधी भेटलो तर हात वर करायचा एवढंच. एकदा मी इस्त्रीवाल्याच्या दुकानावर कपडे घेण्यासाठी वाट पाहत उभा होतो. म्हणजे अधिकाऱ्यांच्या घराजवळच्या विहिरीच्या तिथे, वामन डोंगरे, बर्वे ह्यांच्या घरांजवळ... मी त्यावेळी इंटरला होतो असं अंधुक आठवतंय. तिथे हा भेटला. "काय कसं काय" पासून किरकोळ गप्पा सुरु झाल्या. भय्याने कपडे दिले, आणखी दहा कपड्यांना इस्त्री केली... कॉलेजच्या विषयावरून सुरु झालेल्या गप्पा आता चौफेर धावायला लागल्या होत्या. काही वर्षं एकाच शाळेत असून कधीच विशेष बोललो नव्हतो, त्याची भरपाई केल्यासारखे आम्ही बोलत सुटलो होतो. शेवटी घरी जायची आठवण झाली. "परत बोलूच" असं मी म्हणालो, पण तो म्हणाला, "बोलण्याची खात्री नाही, मी परवा जातो आहे. हा माझा पत्ता". सोलापूरच्या पॉलीटेक्निक चा पत्ता होता तो.

दोन आठवड्यातच आमची पत्रापत्री सुरु झाली.

लक्षात राहण्यासारखं अक्षर... bold strokes म्हणतात त्यापैकी. आमचा सगळा पत्रव्यवहार इंग्रजीत व्हायचा. का कोणास ठाऊक, पण दोघांच्या ते अगदी नैसर्गिक रीत्या अंगवळणी पडलं. विविध घटना, विज्ञान विषयक, दोघांच्या कॉलेज च्या बातम्या, आणि इतर बरंच काही. सुट्टीत तो घरी आला. सकाळी, संध्याकाळी, मनात येईल तेव्हा आम्ही ठरवून फिरायला जात असू. फिरायला अर्थातच नॅशनल पार्क मध्ये. कान्हेरीच्या रस्त्यावर दोन तीन मैल... कधी पक्का रस्ता सोडून जंगलातून.. तास, दीड तास, दोन तास... सुट्टी संपेपर्यंत हा क्रम चालू होता. त्यावेळी, पार्क मध्ये प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर पाच मिनिटात पक्ष्यांचे आवाज आणि एरवी शांतता यांचं राज्य असायचं. वनराणी, लायन सफारी ह्यांच्या आधीचे ते दिवस. रविवारच्या मुंबईकरांच्या झुंडी सोडून बाकी solitude अनुभवायला सर्वात उत्तम जागा. आणि थोडं आत कान्हेरीच्या रस्त्याला तर काय सांगावं! आमच्या सारख्यांच्या साठी पर्वणीच.

त्याला पत्रमित्र जमवायचा पण छंद होता. एक अमेरिकन मित्र, एक सिंहली (त्यावेळी श्रीलंकेचं नाव 'सिलोन'च होतं) मैत्रीण... पत्रामित्रांकडून चितारलेल्या चित्रात त्याने मला पण सहभागी करून घेतलं. सुट्टी संपल्यावर तो परत कॉलेजला गेला, आणि पत्रापत्री पुन्हा सुरु.

एक वर्षाने मला मेडिकलला प्रवेश मिळाला. तो पण इंजिनियरिंगचं शिक्षण संपवून कॉलनीत परत आला. मुंबईत त्याला नोकरी लागली. थोडं स्वातंत्र्य पण त्याबरोबर आलं. इंग्रजीवर प्रभुत्व होतं त्याचं, त्याच बरोबर वागण्या-बोलण्याची उत्तम तऱ्हा, बाहेरच्या जगात वावरण्याची सहजता होती त्याच्यात. एवढं असूनही, नवीनच मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करणं कल्पनेच्याही बाहेर होतं. कौटुंबिक वातावरणात आणि बाहेरच्या जगात आदर्श असल्यासारखा होता तो.

माझ्यापेक्षा ३ वर्षांनी मोठा असल्याने मला त्याच्याबरोबर नेहमी 'कम्फर्ट झोन' मध्ये असल्यासारखं वाटायचं. आणि मी मेडिकलला असल्याचं त्याला मनापसून कौतुक वाटायचं.माझी मेडिकल कॉलेजची सगळीच वर्षं या न त्या कारणाने काहीशी अडचणीची गेली. पहिल्या दोन वर्षात त्याचा मोठाच आधार होता. त्याच्या शाळेतल्या वर्गमित्रांचा एक ग्रुप होता. त्यातही त्याने मला सामील करून घेतलं.

त्यानंतर काहीतरी चुकलं... कारण मी कधीच विचारलं नाही, पण माझा हा "Friend - Philosopher - Guide" आतल्या आत कुठेतरी हरवला! "फिरायला जायचं का?" तर "आज वेळ नाही". "अमुक करायचं का?" "आज नको, नंतर कधीतरी"... मेडिकल च्या अभ्यासाचं प्रेशर वाढायला लागलं तसा मी होस्टेलवर राहायला गेलो. आमचा पत्रव्यवहार बंद पडला. भेटी पण बंद झाल्या. एक दिवस अचानक तो मेडिकल कॉलेजच्या आवारात भेटला. दुसऱ्या कोणाला तरी भेटायला आला होता. अचानक भेटला, मी त्याला माझ्या खोलीवर घेऊन गेलो. थोड्या अवघडून, पण तरी मोकळ्या गप्पा मारल्या. हळू हळू गेलेले दिवस परत आले. दोन तास गप्पा मारून मग तो परत गेला. तीन दिवसांनी त्याचं एक लांबलचक पत्र आलं! मधला काही महिन्यांचा काळ आम्ही दोघांनी पुसून टाकला. प्रश्न नाहीत, स्पष्टीकरणं पण नाहीत.

यथावकाश माझं कॉलेज पण संपलं. मी MBBS झालो ह्याचा त्यालाच जास्त आनंद झाला असावा! मी मेडिकल कॉलेज मध्ये, होस्टेलवर राहूनही दारूला स्पर्श केला नव्हता. त्या दिवशी हा म्हणाला, "लेट अस सेलेब्रेट"... मित्र म्हणून आणि व्यक्ती म्हणून माझाही त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. 'चिअर्स' म्हणून ग्लास उचलला आणि त्याने माझं अभिनंदन केलं.

माझी इंटर्नशिप सुरू होती... एक दिवस किरकोळ निमित्त होऊन हा आजारी पडला. एकातून दुसरं... म्हणता म्हणता विषमज्वरासारखा वाटणारा आजार बळावत गेला. के ई एम मध्ये त्याच्या वर्गातले सुद्धा दोन डॉक्टर होते... सर्व उपाय व्यर्थ गेले...

माझा "Friend - Philosopher - Guide"... सुधीर वाघ... तिशीच्या आतच आई, वडील, भाऊ, आणि मोठा मित्रांचा गोतावळा ... सर्वांना सोडून गेला.

*************

No comments: