Monday, July 25, 2011

अवि-स्मरणीय - १ : प्रास्ताविक.

आजवर जिथे जिथे राहिलो त्या प्रत्येक ठिकाणाच्या आठवणी कैकदा येतात. अनेक शहरं आणि गावं काही महिने, काही वर्षं राहिल्यावर आपलीशी होऊन जातात. पण श्रीकृष्णनगरला त्या आठवणींच्या जगात फारच विशेष स्थान आहे. 'त्या' काळात तिथे मोठ्या झालेल्या व्यक्तींना श्रीकृष्ण नगर आपल्याबरोबरच मोठं झाल्यासारखा वाटत असावं! आणि एका अर्थाने ते खरंही आहे. मोजकीच घरं, कच्चे रस्ते, खांबांवरून नेलेल्या विजेच्या तारा, कमी दाबाने येणारं सोसायटीच्या विहिरीचं किंवा अंगणातल्या विहिरीचं पाणी... प्रत्येक जण प्रत्येकाला ओळखत असण्याचे ते दिवस. मोठ्या पिढीतल्या सगळ्यांना "काका" हे उपनाव (किंवा तत्सम) आपोआप जोडलं जाण्याचे ते दिवस. ... कोणी म्हणेल, मराठी मुलांमध्ये ते तर आजपण दिसून येतं. खरं आहे, पण सगळ्यांनी एकमेकाला ओळखण्याचे 'ते' दिवस गेले असं मात्र मला राहून राहून वाटतं.

पण श्रीकृष्णनगराची खासियत ही की, सामाजिक जीवनात तेव्हा एकसंधपणा होता – निदान मुलांच्या बाबतीत तरी होता! माझ्या आठवणी त्या एकसंधपणाच्या आहेत. खरं सांगायचं तर श्रीकृष्णनगरच्या आठवणींमध्ये कडवटपणाला जागाच नाही. कधी कुठे खरचटलं असेल... तर त्याचं कधीच विस्मरण झालेलं आहे. गोड आठवणी ह्या चिरंतन असतात. माझ्या आठवणी म्हणूनच निखळ आठवणी आहेत. घटना असोत की व्यक्ती असोत - त्यात कुठेही judgmental attitude नाही.

कितीही छोटा समाज असला तरी शेवटी सगळी माणसंच, त्यात गैरसमज, मतभेद, हेवेदावे हे असायचेच. अनेक ठिकाणी छोट्या घरांमधून मोठी, अविभक्त कुटुंबं रहायची.बऱ्याच घरांमध्ये भाडेकरू असायचे. कौटुंबिक अडचणी, हेवेदावे, घरमालक-भाडेकरू मतभेद - साधारण मध्यम वर्गीय समाजात कालानुरूप जे जे असतं ते सगळं असायचं. शिळोप्याच्या गप्पांमध्ये भलंबुरं बरंच काही बाहेर येत असेलही. माझ्या आठवणीत, जे चांगलं दिसलं आणि ज्याचा माझ्या आयुष्यावर चांगला परिणाम झाला, तेवढंच राहिलं आहे.

माझ्या आठवणीतलं श्रीकृष्णनगर खऱ्या अर्थाने सुसंस्कृत श्रीकृष्णनगर आहे.

 
कोणाही  एका  व्यक्तीच्या  आठवणी  कमीजास्त  प्रमाणात (बहुधा जास्तच! J) आत्मकेंद्रित असू शकतात. हा प्रमाद माझ्या हातूनही घडला असण्याची शक्यता आहे. त्यासाठी आधीच क्षमायाचना करून ठेवतो! उलटपक्षी हे पण सांगावसं वाटतं की, आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रत्येक प्रसंगाचा आपल्या जडणघडणीत निश्चितच हातभार असतो अशी माझी पक्की धारणा आहे. आणि माझ्या बाबतीत हे खरं आहे असं मला मनापासून वाटतं. काही व्यक्तींचा जवळून संपर्क येतो, काहींचा तेवढ्या जवळून येत नाही हाच काय तो सूक्ष्म फरक. आपल्या कॉलनीचा त्यावेळचा आकार आणि त्या काळातली लोकसंख्या पाहता, श्रीकृष्णनगराने त्या वयात जे संस्कार केले त्याचा माझ्या आयुष्यात फार मोठा वाटा आहे. कॉलनीच्या आठवणी काढताना म्हणूनच डोळे ओलावतात.



मुलं मोठी होतात, आम्ही पण झालो, आमची मुलं आयुष्यात आमच्याही पुढे निघून गेली. बरोबरचे बरेच जण  आजी-आजोबा सुद्धा झाले, तर बरोबरचे काही जण आज आपल्यात नाहीतही. आमच्या वर्गातले आम्ही दहा-पंधरा वर्षांचे असताना लहान लहान असलेली मुलं तेव्हा 'लहान' वाटायची, ती सुद्धा आपल्यासारखीच वयाने मोठी झाली आहेत. आमच्या लहानपणी पन्नाशी-साठीचे असलेले काका, आजोबा आणि आज्या, मावश्या आणि आत्या आजूबाजूला असायच्या. आता कधी कधी स्वतःलाच आश्चर्य वाटतं, अरेच्चा! आपण पण आता तेवढेच झालो की! कालाय तस्मै नमः. हे चक्र तर सगळीकडेच सुरु असतं, पण श्रीकृष्णनगरच्या त्या छोट्याशा समाजाच्या पार्श्वभूमीवर, आज कोणी तरुण मुलाला किंवा मुलीला पाहिलं की लगेच ते दिवस आठवतात. पटकन तोंडात शब्द येतात, "अरे! तू 'त्या ह्याचा' किंवा 'त्या ह्याची' ना?" मग एखादी आठवण - बहुधा अशा धर्तीवर : "अरे तुझ्या बाबाने आणि मी एकदा शाळेत अशी काहीतरी खोडी केली होती... बाईंनी आम्हा दोघांना तास भर अंगठे धरून उभं केलं होतं!"

श्रीकृष्णनगर सोडून गेल्यावर तर अशा गोष्टींचं जास्तच अप्रूप. पुन्हा डोळे पाणावतात आणि म्हणावंसं वाटतं "लहानपण देगा देवा..." असा साखरेचा ठेवा श्रीकृष्ण नगर सोडून कुठे मिळणार?

ह्या समूहाच्या यादीमध्ये अनेक ओळखीची नावं दिसतात. बहुतांश 'आद्य' श्रीकृष्णनगर वासीयांच्या तिसऱ्या पिढीतली असावीत! ह्या आठवणींच्या निमित्ताने कुठे काही दुवे साधले गेले तर मला अत्यंत आनंद होईल. 'हरवलेले' वर्गमित्र, इतर मित्र, अशा सर्वांच्या पुढच्या पिढीने संपर्क साधला तर अक्षरशः दुधात साखर! माझ्या बरोबरच्या बहुतेकांना फेसबुक इत्यादीवर शोधायचे प्रयत्न बहुधा असफल होतात! ह्या आठवणींमधून कोणाला असे दुवे सापडले तर जरूर संपर्क साधा, मला खूप बरं वाटेल!

********************************

No comments: