Tuesday, July 26, 2011

अवि-स्मरणीय - ३ : एक, दोन, तीन, चार...

"एक, दोन, तीन, चार... श्रीकृष्णनगरची पोरे हुषार!" आवाज जवळ यायला लागलाय... मला उशीर झालेला आहे! "भिजण्याच्या लायकीचे" कपडे घालून मी पण पळत पळत जातो. "गोविंदा! गोविंदा! गोविंदा!" लहान मुलं, 'मोठी मुलं', बरेचसे 'काका' ... सगळा आवाज गळ्यातून... ढोल नाही, ताशा नाही... नाचत नाचत, धावत धावत, पुढच्या घरी. एकेमेकांच्या खांद्यावर हाताच्या कड्या करून जल्लोष..."गरम पाणी पायजे! गरम पाणी पायजे!!" (हे 'अशुद्धलेखन' नाही, त्या गदारोळात "पायजे"च बरोबर होतं!). वरच्या मजल्याच्या ग्यालरीत कठड्यावर पाण्याच्या बादल्या आणि हंडे तयार आहेत. पहिला हंडा अंगावर येतो अनु हुडहुडी भरते. पुन्हा जल्लोष "गरम पाणी पायजे!" पण नाही... मग एक मामी नैवेद्याचं ताट घेऊन येतात. केळी, दहीकाला, शिरा, जे असेल ते. बावडेकर काकांच्या (म्हणजे पोवळ्यांच्या समोरचे) खांद्यावर भलं मोठं पातेलं विराजमान झालेलं असतं. त्यात भर पडते.

पावसाची रिपरिप सुरु झालेली असते. पुढच्या घरावर हंडी बांधलेली आहे. चला रे चला. "अरे ए सुभाष, विल्या (सुभाष आणि विलास कोलगे), कुठे आहात रे?"... "हां हां येतो... सुभाष, विलास, निम्गुळकर, अरविंद (कुलकर्णी)...खालची फळी खांदे अडकवून तयार. पुन्हा दोन चार नावं... मधली फळी... कोणीतरी घसरून पडतो. आम्ही छोटे लोक बाजूला मजा बघत उभे असतो. तेवढ्यात वरून एक मोठं पातेलं रिकामं होतं... आहाहाहा गरम पाणी. तोवर घसरून पडलेला सावरलेला असतो. वरचा मजल चढायला सुरुवात करतो. “गोविंदा............!” हंडी फुटते. नैवेद्याच्या पातेल्यात भर पडते.

हंड्या काही फार उंच असायच्या असं नाही... कॉलनीत एका मजल्याच्या वर घरंच नव्हती! हंडीच्या दोरीला नोटा बांधलेल्या नसायच्या. आणि हंडी कोणी फोडायची ह्याचे वाद नसायचे. शेवटी ते एकुलतं एक श्रीकृष्ण नगर होतं! तिथे एकच 'गोविंदा'! जे होतं ते त्या एकाच श्रीकृष्णनगराचं होतं, तिथल्याच गोपालांचं होतं. कोणी जास्त शहाणपणा केला तर कोणीही काका दम भरायला हजर होते. सगळे आपलेच होते, प्रेमात आणि रागात.

पावसात आणि घराघरातून ओतलेल्या पाण्यात भिजत बाल गोपाल चालले आहेत...आणखी चार घरं... "चला रे चला.. प्रसाद वाटताहेत काका"... काही कोरडे पोहे, काही काल्यातले, गूळ, मनुका आणि बेदाणे, केळ्याचे आणि इतर फळांचे तुकडे, साखरफुटाणे, खोबऱ्याचे तुकडे, आणि बरंच काही - सगळ्याचा छानपैकी 'खराखुरा' काला झालेलं असा तो प्रसाद म्हणजे भिजलेल्या पण तरीही ना दमलेल्या मुलांना पर्वणी असे. दर १५-२० मिनिटांनी ओंजळीत घेऊन स्वाहा करायचा... हात? ते तर पावसात आणि वरून ओतलेल्या पाण्यात आपोआपच धुतले जात होते. रस्त्यावर थोडाफार चिखल असायचा, पण तोही असाच धुतला जात होता.

ह्या घरी सामसूम दिसते आहे. "घरात नाही पाणी घागर... उपाशी रे.... उपा___शी!"  अरेच्चा... ह्या काकूंच्या लक्षात नाही आलं 'गोविंदा' इतका जवळ आला आहे! "अग... मुलं आली बघ .... पाणी आण पाणी आण..."  हंडे बाहेर येतात... काका रिकामे करतात.

"एक, दोन, तीन चार... श्रीकृष्ण नगरची पोरं हुषार..." रस्त्यारस्त्यावरून, घराघरावरून गोविंदा चालला आहे. दहा, अकरा, बारा... एक वाजला. कृष्णाच्या देवळापासून सुरु झालेलं गोविंदा पुन्हा देवळापाशी आला... प्रसादाचं पातेलं भरत होतं, रिकामं होत होतं... आता ते पूर्ण रिकामं झालेलं असतं. काका लोक लहान मुलांना घरी पाठवायचा प्रयत्न करताहेत. आम्ही मात्र हळूच नदीच्या पाण्याचा अंदाज घेतो आहोत. पाणी कमरेच्या वर नाहीये. काकांनी आधीच तो अंदाज घेतलेला असतो - त्यांना माहित असतं की ही पोरं डुंबायला जाणार आहेत. पाणी गढूळ दिसत नाही म्हणजे पुराची शक्यता नाही. काल विशेष पाऊस पण नव्हता. आठ दहा मुलं मग तासभर नदीमध्ये.

कडकडून भूक लागलेली आहे, दोन वाजायला आले. घरी नैवेद्य दाखवून झालेला असेलच ... गरम गरम जेवण...

संध्याकाळचे वेध लागलेले असतात. पालखी निघते. पांढरा स्वच्छ सदरा आणि पायजमा आणि त्यावर टोपी घातलेले भाई कर्णिक पालखीच्या पुढे... नंतर जोशी काका आले... (अगदी सुरुवातीच्या दिवसात जोशी काका नव्हते!) "मार्गी हळू हळू चाला... मुखाने कृष्ण कृष्ण बोला"... भाई 'लीड' करताहेत, बाकीचे कोरस मध्ये त्यांच्यामागून गाताहेत. तिन्हीसांजा होताहेत... पालखीच्या बरोबरच्या समया.. कृष्णाची धीरगंभीर आवाजातली गाणी...

काय गम्मत आहे पहा! मला जेवढे असे दिवस आठवताहेत त्यात सकाळी गोविंदाच्या वेळी पाऊस आणि संध्याकाळी उघडीप असंच चित्र मनाच्या डोळ्यांसमोर येतं आहे... श्रीकृष्ण नगरची जादू!

कृष्णजन्म असो, गणपती असो की शिवजयंती... मोठ्या संख्येने मिरवणूक हि व्हायलाच हवी. शिवजयंतीची पण पालखी असायची. भाईंची आणखी एक खासियत (नंतर जोशीकाकांची सुद्धा) म्हणजे स्वरचित ओळी स्वरबद्ध करून गायच्या. (ह्या ओळी मी तरी कुठल्या गाण्यात ऐकलेल्या नाहीत, त्यामुळे त्या श्रीकृष्ण नगरच्या वातावरणात जन्मलेल्या आहेत असं मी धरून चालतो!) चू. भू. द्या. घ्या. "पुनरपि शिवबा जन्मा या... महाराष्ट्राचा मुजरा घ्या..."   ... मला आठवणारी श्रीकृष्णनगरातली शिवजयंती ही बाबासाहेब पुरंदरे प्रसिद्ध झाले नव्हते, "रायगडाला जाग" आलेली नव्हती, आणि शिवाजी महाराजांचं राजकीय भांडवल झालं नव्हतं, तेव्हाची आहे.

कॉलनीमधला सर्वात मोठा उत्सव गणेशोत्सव होता ह्याबाबत वाद नसावा. गणपतीच्या एक दोन महिने आधीच उत्सवाचं वातावरण दिसायला लागे. वर्गणीची सक्ती नाही, किती द्यावी ह्याबाबत दबाव नाही... घरचं कार्य असल्यासारखे कार्यकर्ते वावरताहेत... नाटकाची तयारी, मुलांच्या कार्यक्रमांची तयारी, बाहेरून कोणते कार्यक्रम आणायचे ह्याच्या चर्चा... श्रीकृष्ण भगिनी समाजाची तयारी... सगळीकडे धामधूम. मतभेद असलेच तर मला तरी आठवत नाहीत!

गणेश चतुर्थीला हॉल सुसज्ज व्हायचा. सुरुवातीला बरीच वर्षं हॉलच्या समोरची जागा पक्की बांधलेली नव्हती. खूप नंतर तिथे फरशी आली. बांबूच्या चौकटीवर ताडपत्रीचं छप्पर आणि जमिनीवर कार्यक्रमांसाठी ताडपत्र्या अंथरलेल्या. हॉल आणि समोरची जागा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्रच झालेलं असायचं. सकाळी 'नेहमीचेच यशस्वी' जमलेल्या सगळ्यांना घेऊन गणपती आणायला जायचे. सकाळ संध्याकाळ आरत्यांचा जल्लोष... पहिल्या दिवशी बहुधा कीर्तन इत्यादी... एका संध्याकाळी भगिनी समाजाचं हळदीकुंकू. एक दिवस मुलांचे कार्यक्रम.

स्थानिक कलाकारांचं नाटक म्हणजे एक पर्वणी. कॉलनी एवढी लहान असूनही, इतक्या वर्षांनंतर आठवण राहील एवढी 'स्थानिक प्रतिभा' तिथे होती ह्याचं राहून राहून कौतुक वाटतं. कितीही नावं घेतली तरी काही निसटून जायची भीती! माझ्या आठवणीतला १९५८ ते १९६७-६८ पर्यंतचा तो काळ म्हणजे खरोखरच सुवर्णकाळ असल्यासारखं वाटतं.

बजेटात बसेल त्याप्रमाणे बाहेरचे कार्यक्रम आणले जात. अंधशाळेचा वाद्यवृंद, सुधा करमरकरांच्या बाल रंगभूमीचा 'अल्लादिन', वि. र. गोड्यांच्या नकलांचा कार्यक्रम, सचिन (होय, सचिन पिळगावकर) चा डान्स, सुरेश हळदणकर यांचं गाणं... किती किती सांगू! काही बाहेरच्या व्यावसायिक कार्यक्रमांना हॉलचं स्टेज कधी कधी लहान पडायचं, पण कार्यक्रमांची गोडी कमी झाली नाही!

इतक्या सगळ्या आठवणींमध्ये थोडंफार विस्मरण साहजिक आहे, तसंच काही चित्रांचे मनातले ठसे पक्के असणंहि साहजिक आहे. असे काही क्षण, असे काही कार्यक्रम...

स्थानिक कलाकारांच्या एका नाटकात (आता नाव पण आठवत नाही), खलनायक, नायिकेच्या कुरूप नवऱ्याला उद्देशून "हाईड" असं ओरडतो. (डॉ. जेकिल & मि. हाईड ह्या गोष्टीच्या संदर्भात)... त्यावेळी प्रसंग नाट्यमय करायला पडद्यामागून मोठ्या झांजेचा (cymbal , band मध्ये असते ती) प्रचंड आवाज केला गेला. प्रेक्षक खरोखर दचकले होते!

"प्रेम तुझा रंग कसा" हे नाटक व्यावसायिक होता की स्थानिक ते आता आठवत नाही, पण मनात पक्की समजूत आहे ते स्थानिक असावं... माझ्या आठवणीतलं सर्वात उत्तम नाटक - कॉलनीत पाहिलेलं.

वि. र. गोड्यांच्या नकला म्हणजे एक मेजवानीच! हिटलरच्या नकलेतला आवेश (अर्थातच मूक नाट्य म्हणून!) चार्ली चाप्लीनच्या तोडीचा. आचार्य अत्रे तर १०१%. एकपात्री 'एकच प्याला' चं विडंबन ह. ह. पु. वा. करणारं. तात्कालिक राजकारणावर - नेहरू सुधाकरच्या भूमिकेत आणि यशवंतराव चव्हाण सिंधूच्या. सिंधू म्हणते, मी आजन्म आपल्या पायाशी राहीन वगैरे... आणि नेहरू (सुधाकर) : "लेकिन मैं तुझे यूंही ठुकरा दूंगा". हा प्रसंग आणि अत्र्यांची नक्कल संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर! ह्या सगळ्या नकलांना एन्ट्री अर्थातच विंगेतून. आणि मग "तुम्हा सर्वांचे लाडके पंतप्रधान पंडित नेहरू येत आहेत..." प्रेक्षकांचे डोळे विंग कडे... "येत आहेत तुमच्या मधून!" आणि खरेखुरे वाटणारे 'नेहरू' नमस्कार करत, पुलाच्या बाजूने, प्रेक्षकांच्या दोन भागांच्या मधून...

खरं तर अशा तुटक आठवणींमधून पूर्ण चित्रं उभं राहणं कठीण आहे... हा आपला दुबळा प्रयत्न. १९६८-६९ च्या सुमारास आमची 'तरुण' पिढी पुढे यायला लागली होती. पुढे माझा मेडिकलचा अभ्यास आणि आईचं प्रदीर्घ आजारपण ह्यामुळे माझा सहभाग कमी होत गेला... पुढे कॉलनी सोडली, पण ती केवळ 'तांत्रिक' दृष्ट्या... कॉलनी आणि तिथलं मित्रमंडळ आणखी बरेच वर्षं खंबीर होतं! कारण बोरिवलीत तरी बराच काळ वास्तव्य होतं. पण त्या सुमारास स्थानिक कलाकारांची संगीत स्पर्धा झालेली आठवते. शेखर (गोरे) तबलावादक! (त्यावेळी जितेंद्र नुकताच चिमोटे गुरुजींकडे शिकायला सुरुवात करत होता). शेखरने मला विचारलं, सुहास (बावडेकर, दुसरा कोण!!!) ला व्हायोलिनची साथ करशील का? नाही म्हणायचा प्रश्नच येत नव्हता! अभिषेकी बुवांची पहिलीच भावगीतं तेव्हा नुकतीच तुफान लोकप्रिय झाली होती. तालमीसाठी आम्ही दोन्ही बसवली होती – “शब्दावाचून कळले सारे” आणि “माझे जीवन गाणे”. प्रत्यक्ष स्टेजवर “माझे जीवन गाणे”...

अवि-स्मरणीय च्या ह्या भागाचा ह्या घटनेने शेवट व्हावा हे पण विधिलिखित असावं! आज सुहास पण आपल्यात नाही. त्या वर्षानंतर माझी व्हायोलिनची तालीम कमी कमी होत गेली... आयुष्यात सुरु करून अर्धवट राहिलेल्या अनेक गोष्टींपैकी ही एक. त्यानंतर मी जास्त जास्त 'कानसेन' होत गेलो... संगीताचा अभ्यास भरपूर केला, नात्यातल्या आणि मित्रपरिवारातल्या अनेकांना संगीतात रस घ्यायला लावलं... इथे ऑस्ट्रेलियामध्ये पण हिंदुस्तानी संगीतावर बोललो, अजून असे कार्यक्रम (ध्वनिमुद्रित संगीताच्या सहाय्याने) करायचा मानस आहे - इथे माझ्या आजूबाजूच्या बऱ्याच 'गोऱ्या' मित्रामान्दालींना रस आहे... पण व्हायोलीन, ते माझ्याकडे अजूनही आहे, पण मूक झालं आहे... आठवणीनी पापण्यांच्या कडा ओलावल्या नाहीत तर ते श्रीकृष्ण नगर नव्हेच!

**********************

5 comments:

विनायक पंडित said...

य्ये ब्बात है अविदादा! म स्त च! खूपच आवडलं.तुमचं लिहिणं वाचताना गुंगून रहायला होतं.तुमचं निरीक्षण, त्यावरच्या मार्मिक प्रतिक्रिया छानच!
<<मला आठवणारी श्रीकृष्णनगरातली शिवजयंती ही बाबासाहेब पुरंदरे प्रसिद्ध झाले नव्हते, "रायगडाला जाग" आलेली नव्हती, आणि शिवाजी महाराजांचं राजकीय भांडवल झालं नव्हतं, तेव्हाची आहे.<<
सूर जुळताएत आपले! :)
माझ्या ब्लॉगची लिंक पाठवतोय.सवडीने जरूर वाचा!
http://vinayak-pandit.blogspot.com/2008/12/making-up-for-theatre.html
आणि हो! हे चांगलं ललित झालंय.विस्कळीत वगैरे अजिबात नाही! पुढचे भाग लवकर लिहा हा प्रेमाचा आग्रह!

Onkar Bhardwaj said...

मस्त लिहिलं आहे अविकाका! झ्ररझर तिन्ही भाग वाचून काढले, चौथा पण लवकर येऊ द्या!

Avinash Bharadwaj said...

ओंकार, तुला हा ब्लॉग कसा सापडला?
:-)

Vilas said...

फारच छान.जुन्या आठवणीना उजाळा.फक्त एक शंका.वि र गोडे कि सदानंद जोशी ? गोडेंच्या फक्त गायकांच्या नकला आठवतात
..

Avinash Bharadwaj said...

विलास, तू पेचात टाकलस खरं. आता माझा पण गोंधळ झाला. वि र गोडे हे नाव मनात पक्कं बसलं आहे, पण तू म्हणतोस ते बरोबर वाटतंय. सदानंद जोशीच असावेत ते. एवढं मात्र नक्की : वि र गोड्यांचा पण कार्यक्रम एका गणेशोत्सवात झाला होता.