Monday, February 13, 2012

ऑस्ट्रेलिया - १.

मी ऑस्ट्रेलियात कसा आणि का आलो?
(खरं तर "आम्ही", पण प्रत्येक वेळी मी/आम्ही लिहायचं, आणि क्रियापदांची चिरफाड करायची, हे टाळण्यासाठी प्र. पु. ए. व. वापरलं आहे!)


ऑस्ट्रेलियात कसा आलो ह्या प्रश्नाचं उत्तर सोपं आणि सरळ आहे "योगायोगाने". 'का आलो' ह्यापेक्षा 'का राहिलो' हा प्रश्न जास्त सयुक्तिक आहे.

भारतात असतांना ऑस्ट्रेलियाला जाण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं - किंबहुना कायम परदेशी वास्तव्य करावं असाही विचार प्राबल्याने आला नव्हता. स्वप्न पाहायला फुरसतही नव्हती म्हणा! सरकारी नोकरीच्या नित्यक्रमात रहावसं वाटलं नाही, काहीतरी वेगळं करावं म्हणून नाशिकच्या खाजगी कॉलेज मध्ये गेलो. तिथे विभागप्रमुखाची जागा मिळाल्यामुळे आपल्या काही शैक्षणिक कल्पना राबवता येतील का पहावं म्हणून. मुंबईच्या नोकरीत वीस वर्षांनंतर निवृत्तीचे फायदे मिळाले असते त्यावर पाणी सोडून. व्यक्तिगत आयुष्यात चाळीशीच्या सुमारास पुन्हा शून्यापासून सुरुवात करायची होती. अनिश्चितता आणि भवितव्याची काळजी यांनी ग्रासून जाण्यापेक्षा, पुढची वाट आज न उद्या सापडेलच ह्या विश्वासाने आला दिवस पूर्णार्थाने जगावा हे उत्तम असं समजून! मुंबईत असतांना चिक्कार ट्रेकिंग केलं होतं, आता आयुष्याच्या ट्रेकची सुरुवात करावी म्हणून.

१९९० ... नाशिक. नवीन मेडिकल कॉलेज, नवीन शरीरशास्त्र (Anatomy) विभाग. नवी जबाबदारी, नवी आव्हानं... दोन लहान मुली... १९९२ मध्ये केव्हातरी माझा पूर्वीचा एक विद्यार्थी, आता प्रथितयश सर्जन, प्रशांत साठे ह्याने एक जाहिरात दाखवली. मलेशिया मध्ये मेडिकल कॉलेज साठी anatomist पाहिजे अशा आशयाची. हो-नाही करता करता अर्ज पाठवून दिला. नाशिक किंवा भारत कायम सोडून जाण्याचा असा विचारही केला नव्हता. पुढे त्या जाहिरातीचं विस्मरण व्हावं इतके दिवस गेले. एक दिवस अचानक तिकडून पत्र आलं - आम्ही तुम्हाला ऑफर दिली होती, तुमचा निर्णय काय आहे ते त्वरित कळवा. मग पत्रापत्री, व्हिसा, 'प्लेग'ची साथ आणि त्यामुळे व्हिसावर बंदी असं होता होता शेवटी १९९४ च्या नोव्हेंबर मध्ये आम्ही मलेशियाला पोहोचलो. त्यावेळी भारतामध्ये मलेशिया पर्यटनाला सुरुवात झाली नव्हती, आणि नोकरी-व्यवसायाच्या नकाशावर मलेशिया नव्हता! आम्ही मलेशियात पोहोचलो तेही वायव्य कोपऱ्यामध्ये, थायलंडच्या सीमेजवळ एका छोट्याशा शहरात. कोटा भारू ही क'लान्तान ह्या राज्याची राजधानी. क'लान्तान राज्य मलेशियाच्या इतर भागाच्या तुलनेत काहीसं 'मागासलेलं'. माझी परदेशातली पहिलीच नोकरी. पहिली तीन वर्षं जम बसण्यात गेली.

तेव्हाही दीर्घकाळचे बेत करण्यासारखी परिस्थिती नव्हती. तीन वर्षांच्या करारावर नोकरी असे. बहुधा कराराचं नूतनीकरण व्हायचं, पण त्यावर अवलंबून राहता येत नसे. मुख्य म्हणजे, साधारण सहावी नंतर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न भेडसावायला लागायचा. जास्त उशीर केला तर भारतीय शालेय पद्धतीमध्ये मुलांचा पाडाव लागायचा नाही ही भीती असायची. अशा वयाच्या मुलांचे पालक मग भारतात परत जात किंवा मग नवरा तिकडे आणि बायको-मुलं भारतात अशी सोय करत. परत गेल्यास, ज्यांची स्वतःची प्रॅक्टिस असेल त्यांचं ठीक असे, पण मेडिकल कॉलेज मध्ये नोकरी करणाऱ्यांना त्याच पातळीवर (seniority) नोकरी मिळेलच अशी खात्री नसायची. आम्ही तो विचार बाजूला ठेवला. आम्ही जग पाहायला बाहेर पडलो होतो. तेव्हा 'आज जसा आहे तसा अनुभवावा, उद्याची बात उद्या' असं म्हणत आम्ही 'जिवाचा मलेशिया' करायला सुरुवात केली. 'विकसनशील देश' असं लेबल असलेला मलेशिया... पण तिथल्या एवढ्या लहान, 'मागासलेल्या' शहरात सुद्धा सुंदर रस्ते, उत्तम टेलिफोन व्यवस्था, विद्यापीठाचं सुंदर कॅंपस... सगळं भावणारं होतं. (त्याबद्दल नंतर केव्हातरी!). मध्यमवर्गीयाला परवडतील अशा मोटर गाड्या... (आज हे गमतीशीर वाटेल, पण १९९४-९५ साली भारतातून आलेल्या प्राध्यापकाला ही नवलाईची गोष्ट होती). चार माणसांच्या कुटुंबाला देशात कुठेही फिरायला ती कार हे सर्वात किफायतशीर साधन होतं. एका वर्षानंतर (१९९५) विद्यापीठाने सर्वांना कम्प्युटर दिले, इ-मेल आणि इंटरनेटची सोय करून दिली.

तीन वर्षांनी पुढचं contract पण मिळालं. मुली प्राथमिक शाळेत जायला लागल्या. 'राष्ट्रीय' शाळांमध्ये मलेशियाच्या राष्ट्रीय भाषेत शिक्षण असे. मोठ्या शहरात 'International' शाळा असायच्या - खूप खर्चिकही असायच्या. कोटा भारू मध्ये परदेशी लोक मुळात मोजकेच. तिथे एकुलती एक आंतरराष्ट्रीय शाळा. ती पण विद्यापीठातल्या प्राध्यापकांच्या बायकांच्या जिवावर चालायची! पहिली ते अकरावी इयत्तांमध्ये सर्व मिळून विद्यार्थी असायचे ६०! तर अशा शाळेत, इंग्रजीमध्ये मुलींचं शिक्षण सुरु झालं. असं जास्त काळ चालणं शक्य नव्हतं! एके दिवशी एका भारतीय स्नेह्यांनी जाहीर केलं - मी ऑस्ट्रेलियाला जातो आहे. ते होते मानसोपचार तज्ञ (Psychiatrist). काही क्षेत्रातल्या डॉक्टरांना ऑस्ट्रेलिया मध्ये जास्त मागणी असायची, त्यातलं हे एक. पण सर्वांनाच ते सहजसाध्य नव्हतं. माझ्यासारख्या शुद्ध शिक्षकी पेशाच्या व्यक्तीला ते जवळ जवळ अशक्य होतं.

पुन्हा एक 'खिडकी' अशीच उघडली. इंटरनेट वर फिजी देशातून मेडिकल कॉलेज ला anatomist पाहिजे अशी जाहिरात आली. फिजीबद्दल काहीसं कुतूहल होतं - प्रशांत महासागरातला बेटांचा अतिशय सुंदर देश, अशी ख्याती असलेलं फिजी. मेडिकलला विद्यार्थी असतांना फिजीमधला एक भारतीय वंशाचा मुलगा माझ्या वर्गात देखील होता. असं कुतूहल, आणि एवीतेवी आम्ही "International ट्रेक" वरच निघालेलो होतो. इंटरनेट वर तपशील भरून पाठवला - तीन दिवसात तिकडून फोन आला, फोन वरच मुलाखत ठरली, आणि १९९९ च्या जुने मध्ये आम्ही फिजी मध्ये दाखल झालो. फिजीला स्नेहाने परदेशात प्रथम नोकरी धरली. त्वचारोगतज्ञ म्हणून मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये. तिथे एका pathologist मित्राच्या बरोबर तिने एका कॉन्फरन्सला जायचं ठरवलं. ती कॉन्फरन्स होती पर्थला. तो दिवस उजाडायच्या आधीच फिजी मध्ये बंडाळी झाली. आमचं घर बंडाच्या केंद्रास्थानापासून हाकेच्या अंतरावर. दोन लहान मुली असल्यामुळे सुरक्षित वाटणं शक्य नव्हतं. अतिशय तणावपूर्ण दहा दिवसांनतर आम्ही फिजी सोडून पुनश्च मलेशियात (दुसऱ्या विद्यापीठात) दाखल झालो.

अचानक, पर्थ मधल्या कॉन्फरन्सच्या संयोजकांनी पृच्छा केली - तुझ्या येण्याचं काय झालं? तोपर्यंत फिजीमधल्या स्नेहाच्या प्रायोजकांनी (sponsor ) माघार घेतली होती. पण पर्थ मधल्या डॉक्टरांनी त्यांच्या एका योजनेनुसार तिला कॉन्फरन्सचं खर्च देऊ केला. कॉन्फरन्स मधलं तिचं प्रेझेन्टेशन ऐकून तिला अभ्यासासाठी काही काळ तिथे येण्याचा सल्ला दिला. पुढच्या वर्षी आम्ही दीड महिना पर्थ मध्ये स्वतःची रजा काढून त्यानिमित्ताने घालवला. त्यावेळी माझ्या पदरी फिजी आणि मलेशियामधला शिक्षण पद्धती आणि अभ्यासक्रमाची रचना ह्यातला अनुभव होता. त्याच्या जोरावर मीही पर्थ मध्ये त्या काळात थोडंफार काम केलं. लवकरच त्या anatomy विभागात एक जागा तात्पुरती रिकामी झाली. एक, जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी त्या जागेसाठी माझी नेमणूक करायची तयारी त्या विभागाने दर्शवली.

एका वर्षाची दोन वर्षं झाली, दोनाची तीन झाली. मुली हायस्कूलच्या वयाच्या होत होत्या. कुठेतरी त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत स्थिर वास्तव्य करायला हवं होतं. त्याच वेळी एका नवीन कोर्स साठी अभ्यासक्रम तयार करायला एक समिती स्थापन झाली, anatomy विभागाचा प्रतिनिधी म्हणून मला त्यावर जागा मिळाली. ऑस्ट्रेलिया मध्ये, ४५ वर्षं वयाच्या नंतर कायम वास्तव्याचा व्हिसा केवळ 'employer nomination / sponsorship' वर मिळतो. विद्यापीठाने त्याप्रमाणे कार्यवाही करायची तयारी दाखवली. आमचा "international ट्रेक" संपत आला होता.

प्रथमदर्शनी मला पर्थ शहर आवडलं होतं. का ते सांगता येणार नाही. तेव्हा तर आम्ही मोजक्या दीड महिन्यासाठी तिथे गेलो होतो. शहरच नव्हे, तर anatomy विभागाबद्दल सुद्धा मला काहीशी आत्मीयता वाटली होती. आपलं इथे जमून जाईल असं वाटलं होतं, पण शाश्वती कशाचीच नव्हती. खरं तर एका वर्षाच्या नोकरीमध्ये पण कसलीच शाश्वती नव्हती. त्या पहिल्या तीन वर्षात स्नेहाची तर काहीशी कुचंबणाच झाली. परदेशी डॉक्टर म्हणून तिथल्या परीक्षा दिल्याशिवाय तिला तिच्या क्षेत्रात प्रवेश मिळणं अशक्य होतं. मी शिक्षकी पेशात असल्याने माझ्यावर ते बंधन नव्हतं. पण माझ्याच नोकरीची शाश्वती नसतांना तिने परीक्षेच्या उठाठेवी (!) करण्यातही फारसा अर्थ नव्हता. पर्थमधल्या पहिल्या दोन वर्षात तिने मलेशियाच्या वाऱ्या केल्या, 'व्हिजिटिंग लेक्चरर' म्हणून. पण त्यालाही मर्यादा होत्या. थोडक्यात, ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होणं म्हणजे 'लाल गालिचा' समोर आल्यासारखं नव्हतं. असं असूनही पर्थ आणि ऑस्ट्रेलिया, anatomy विभाग आणि हे विद्यापीठ ह्यांच्याबद्दल आत्मीयता वाटली खरी!

ह्या सबंध कालखंडात भारतात (मुंबई, पुणे, नाशिक किंवा अन्यत्र) यावंसं वाटलं का? हा एक मोठाच प्रश्न आहे. त्यासंबंधी लवकरच!

**************************

1 comment:

Dr. Ujjwala Dalvi said...

हे जे ‘नंतर कधीतरी’ म्हणून सोडतोस ते Wodehouseच्या ‘What happened at the dog races..' सारखं कायम अध्याहृत ठेवू नकोस. एक्दा सगळे ‘नंतर..’ शोधून सांगून टाक म्हणजे टांगणीवरची उत्सुकता भांड्यात पडेल.
-उज्ज्वला.