Wednesday, February 29, 2012

ऑस्ट्रेलिया आणि वर्णद्वेष – २ : ब्रेन वॉशिंग!


ह्यापूर्वी, ह्या विषयावर : भाग १

मे २००९ मध्ये मेलबर्न शहराच्या भागात होणाऱ्या हल्ल्यांची वृत्तं यायला लागली. सुरुवातीपासूनच भारतीय माध्यमांमध्ये ह्या हल्ल्यांची वर्णनं 'वर्णद्वेषी' हल्ले अशी व्हायला लागली. ह्याला तर्कशास्त्रात "Fallacy of Hasty Generalisation" म्हणतात! हल्ल्यांचा परामर्श घेताना; मेलबर्न हे एक प्रचंड शहर आहे, तिथे चांगले-वाईट भाग आहेत (जसे कोणत्याही मोठ्या शहरात असतात), वेगवेगळ्या भागात गुन्हेगारीचं प्रमाण आणि गुन्हेगारीचे प्रकार वेगळे असू शकतात, हल्ले कोणत्या वेळी झाले आणि रात्री-अपरात्री झाले असल्यास त्या व्यक्ती तिथे कशाला गेल्या होत्या... ह्याचा विचार केला गेल्याचं दिसलं नाही! मुंबई एरवी सुरक्षित वाटली, तरी शहाणा माणूस रात्री काही भागांमध्ये जायला धजावत नाही ना! ऑस्ट्रेलिया मध्ये गोरे मायकेल दारू पिऊन दंगा करतात, अशा काही पूर्वग्रहातून ह्या हल्ल्यांना वर्णद्वेषी हल्ले म्हणून सनसनाटी बातम्या लिहिणं त्यांना सोयीचं वाटलेलं दिसलं!

ऑस्ट्रेलिया मध्ये, व्हिक्टोरिया राज्यातले पोलीस तसंच इतर महत्वाच्या व्यक्तींनी सावधगिरीचा पवित्र घेतला. "ह्या हल्ल्यांच्या मागे वर्णद्वेष असेल असं दिसत नाही", "हा रात्रीच्या गुन्हेगारीपैकी प्रकार आहे" इत्यादी. अशा पवित्र्यामागे दोन कारणं असावीत. एक म्हणजे (आणि हे व्यावहारिक कारण वाटतं), पोलिसांना रात्रीच्या गुन्हेगारीचा बराच अनुभव आहे. दुसरं कारण असं, की भक्कम पुराव्याशिवाय वर्णद्वेषाचा प्रकार मान्य करणं ऑस्ट्रेलियामध्ये अवघड आहे. बहुसांस्कृतिक ऑस्ट्रेलियामध्ये वर्णद्वेष हा गंभीर मामला मानला जातो. नित्याच्या व्यवहारात सुद्धा वर्णद्वेषाचा आरोप गंभीर मानला जातो, त्यातून हिंसा / दुखापत झाल्यास त्याची दाखल घ्यावीच लागते. छुपा किंवा उघड उघड वर्णद्वेष ऑस्ट्रेलिया मध्ये आहे की नाही हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे, आणि त्यावर मी नंतर भाष्य करणार आहे.

मित्रांच्या आणि नातलगांच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं, की दृक-श्राव्य माध्यमांमध्ये (टीव्ही इ.) भारतामध्ये २४ तास वर्णद्वेषाचे ताशे वाजत होते. अनेकांनी आमची इ-मेल वर चौकशी केली, काहींनी फोन केले. "इथे सर्व शांत आहे, आम्हाला काहीही त्रास नाही" हे सांगून आम्ही थकलो. काही वेळा, आमच्या सांगण्यावर भारतातल्या आप्तांचा विश्वास बसेना - "अरे आम्ही इथे सतत टीव्हीवर काय पाहतो आहोत!" म्हणजे एकंदर चित्र असं, की जणू ऑस्ट्रेलिया मध्ये गोऱ्या तरुणांचे जमाव रस्त्यास्त्याने फिरताहेत आणि भारतीयांना टिपताहेत! १९६८-६९ च्या मुंबईची आठवण झाली मला तर! (तेव्हा शिवसेनेचा रोख दाक्षिणात्यांवर होता.) गैरसमज गंभीर होता, एरवी मला तर असं फोन आला की हसूच यायचं!

मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून च्या सुरुवातीला, भारतात 'हे हल्ले वर्णद्वेषातून उद्भवतात' ही समजूत पक्की झाली होती असं दिसतं. कोणत्याही अशा प्रकारच्या बातमीत वर्णद्वेष हा शब्द आल्याशिवाय राहत नसे! एका 'प्रतिष्ठित' इंग्रजी वृत्तपत्रातला एक मथळा : "वर्णद्वेषाच्या हल्ल्यांपैकी एका हल्ल्याला बळी पडलेला xxx ह्याला इस्पितळातून घरी पाठवण्यात आलं". (“…xxx, who was attacked on last Monday night in one of several racial attacks on Indian students in Australia, was discharged from the … hospital”).

खरं तर ह्या वेळेपर्यंत बऱ्याच हल्ल्यांमागची खरी परिस्थिती बाहेर आलेली होती. बऱ्याच हल्ल्यांमागचे गुन्हेगार गोरे नव्हते हे दिसून आलं होतं. काही हल्ले इतर गटांच्या लोकांनी केले होते. मध्यपूर्वेच्या काही टोळ्या सिडनी / मेलबर्न भागात आहेत हे सर्वश्रुत होतं. काही हल्ल्यांमध्ये तर हल्लेखोर चक्क भारतीय होते! जुनं वैर, बेबनाव, पैशाच्या व्यवहारातून उद्भवलेले तंटे अशा गोष्टी पण बाहेर आल्या. पण लक्षात घेतो कोण! प्रत्यक्ष पर्थ मध्ये पण एक खून झाला. आपल्याच शहरात झाला म्हटल्यावर आम्ही अर्थातच चकित झालो - दुसऱ्याच दिवशी बातमी आली, की पैशाच्या वैमनस्यातून हा खून झाला, संशयित भारतीयच होता आणि तो एका दिवसात पळाला सुद्धा!

अशा प्रकारांमध्ये बक्षीसपात्र प्रकरण झालं ते एका भारतीयाने "मला मारहाण करून जाळण्याचा प्रयत्न झाला, माझी गाडी जाळून टाकली" म्हणून आरडाओरड केली त्याचं. तपासाअंती असं समजलं की खोटा विम्याचा दावा लावण्यासाठी त्याने स्वतःच्या गाडीला आग लावली आणि त्यात चुकून स्वतः पण भाजला. दुसर्या एका प्रकरणात एक लहान मुलगा बेपत्ता झाला, नंतर त्याचा मृतदेह सापडला - संशयित त्या मुलाच्या पालकांच्या ओळखीचे निघाले.

पण वर्णद्वेषाचे ढोल इतके कर्णकर्कश वाजत होते की सत्य परिस्थिती कोणाला ऐकू गेली नाही!

वर म्हटल्याप्रमाणे, कोणाही पत्रकाराने प्रत्येक प्रकरणाची शहानिशा केलेली दिसली नाही. खरं तर प्रत्येक प्रकरण स्वतंत्र समजून त्याचा मागोवा घ्यायला पाहिजे होता. काही हल्ले अशा उपनगरात झाले होते की तिथे स्थानिक रहिवासी (गोरे/काळे/तांबडे - कोणीही असोत!) वेळी-अवेळी जात नसत. जबाबदार पालक आपल्या पाल्यांना अशा ठिकाणी रात्री उशिरा न जाण्याचा सल्ला देतात, त्याच प्रमाणे सार्वजनिक परिवहनाचा वापर करू नका असंही सांगतात. त्या काळात किमान दोन हल्ले अशा ठिकाणी, अपरात्री झालेले होते.

वृत्तपत्रांची ही तऱ्हा, त्यातल्या बातम्यांवर प्रतिक्रिया देणारे वाचक त्याहून महान. अज्ञान, बिनबुडाचे आरोप आणि शिवराळ भाषेचा तिथे कहर झाला. आंतरजालावर निनावी, बिनचेहऱ्याची वक्तव्यं करता येतात ह्याचा लोकांनी पुरेपूर फायदा घेतला! खरं तर वृत्तपत्रं अशा प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवतात म्हणे! इथे नियंत्रण अभावानेच दिसत होतं! ऑस्ट्रेलिया च्या लोकांच्या रक्तातच गुन्हेगारी भिनलेली आहे कारण शेवटी ते गुन्हेगारांचेच वंशज आहेत, हे गोरे बिनडोक आहेत, ह्यांना दारू पिऊन मारामाऱ्या करण्याशिवाय दुसरं येतं काय... अशी अनेक वक्तव्यं, खास शिव्यांनी अलंकृत केलेली, पहायला मिळाली. अर्थात ह्या गदारोळात भारतातल्या काही वाचकांनी संतुलित प्रतिक्रिया सुद्धा लिहिल्या होत्या हे निर्विवाद, पण एकंदर कल्लोळात त्या कुठल्याकुठे गडप झाल्या. आणि एखाद्या ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीयाने "आम्हाला नाही बुवा असा अनुभव" असं म्हटलं, की त्याच्यावर शाब्दिक मारपीट : "हे गोऱ्यांचे बूट चाटे", "ह्यांना स्वाभिमान नावाची वस्तूच नाही", "हे डॉलर चे भुकेले गुलाम"...

आणखी एक नमुनेदार प्रकार म्हणजे वृत्तपत्रात ब्लॉग लिहिणारे काही महाभाग. त्यातले काही तर म्हणे वृत्तपत्राच्या संपादकीय मंडळात असतात! एका 'ब्लॉगर'ने त्याच्या एका पोस्ट ची सुरुवात केली ती ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या काही भारतीयांच्या वक्तव्याने. त्यांचा सूर असाच होता की आम्हाला तर इतक्या वर्षात वर्णद्वेषाचा अनुभव आला नाही. एवढं लिहून मग त्या ब्लॉगर ने टोपी फिरवली. ("पत्रकार म्हणून, दोन्ही बाजू सांगणं हे माझा कर्तव्य आहे" - किती उदात्त!) तो पुढे म्हणतो, "तरी, मी ह्या लोकांशी सहमत नाही - हे हल्ले वर्णद्वेशातूनच झाले आहेत." त्याच्या ब्लॉग वर प्रतिक्रिया लिहिणाऱ्यात सध्या ऑस्ट्रेलिया मध्ये असलेले विद्यार्थी सुधा होते, तेही म्हणाले की असं काही होत नाही इथे. मी स्वतः सुद्धा प्रतिक्रिया दिली, "हे सगळे इथे राहणारे विद्यार्थी काय म्हणताहेत? त्यावर तुझं काही म्हणणं आहे, की आगलावेपणा करून यु नुसती गम्मत बघत बसणार?" ह्यावर त्याने उत्तर दिलं नाही! पण दुसऱ्या एका प्रतिक्रियेला प्रत्युत्तर म्हणून तो म्हणाला, "मेलबर्न मध्ये ज्या ५००० विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली त्यांना नक्कीच वाटतं की इथे वर्णद्वेष आहे". घ्या! "वर्णद्वेष, वर्णद्वेष" म्हणून आक्रस्ताळेपणा केला की ५००० जमा व्हायला वेळ लागत नाही! त्यात त्यांच्या मनात थोडी भीती घातली की मग काय!

त्या ५००० च्या जमावाने "शांततापूर्ण निदर्शनं" केली. त्यांच्या दुर्दैवाने, 'शांततापूर्ण निदर्शना'ची भारतातली व्याख्या आणि इथली व्याख्या निराळी आहे. ह्या ५००० च्या जमावाने मेलबर्न मधल्या मोक्याच्या ठिकाणी (मेलबर्न चं "सी एस टी") संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा केला. प्रचंड नारेबाजी केली, येणाऱ्या-जाणार्या स्थानिकांना शिवीगाळ केली. (यूट्यूब वर म्हणे त्याचे व्हिडीओ आहेत). सर्वात वाईट म्हणजे, "वारसा" (हेरीटाज) मानलेल्या इमारतीची किरकोळ का होईना, नासधूस केली. त्यांच्या नेत्याने नंतर सांगितलं की त्यांचं निदर्शन शांततापूर्णच होतं, इतर समाजकंटक संधीसाधूंनी त्याचा फायदा घेतला. वर उल्लेख केलेल्या ब्लॉगरला वैयक्तिक मानसशास्त्र आणि जमावाचं मानसशास्त्र ह्यातला फरक कळू नये हे नवलच. आणि हो! त्याचा म्हणे पत्रकारितेचा १५ वर्षांचा अनुभव आहे (तो ही भारतातला!). निदर्शकांचे नेते काही काळ का होईना ऑस्ट्रेलिया मध्ये राहिलेले आहेत, त्यांना भारतातल्या आणि इथल्या निदर्शानान्मधला फरक जाणवला नाही हेही एक नवलच.

एका मराठी पत्रकाराने थोडीवेगली भूमिका घेतली. त्याच्या लेखाचं नाव "भय्ये - मुंबईचे आणि मेलबर्नचे"! तत्वतः मी अशी तुलना केली नसती. जागतिक स्तरावरचा वर्णद्वेष आणि भारतामधला प्रांतीयवाद किंवा जातीभेद ह्यात थोडा फरक आहे - साम्यही आहे, पण तो मुद्दा अलाहिदा. तरीही, "भय्ये - मुंबईचे आणि मेलबर्नचे" या लेखात काही मार्मिक विधानं होती. पण एवढं असूनही, ह्या पत्रकाराने एक घोर चूक केली! बातम्या नीट न वाचता "उचलली जीभ...". त्याचा लेख पसिद्ध झाला तो मेलबर्न मध्ये मृत्यू होण्याच्या आधी. तरी, त्याच्या म्हणण्याप्रमाणे : "गेल्या दहा दिवसांत ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर एकामागून एक हल्ले झाले. गोऱ्यांनी भारतीय मुलांना जीव जाईस्तोवर मारलं.काहींचे मृतदेह भारतात आले." मी त्याला विचारलं (त्या वर्तमान पत्रातली प्रतिक्रियेची सुविधा वापरून), "हा शोध तुम्हाला कुठे लागला?" उत्तर मिळालं नाही हे सांगणे नलगे! "बेजबाबदार पत्रकारिता" ह्या घोडचुकीवर मुकुट चढला आपली चूक मान्य/दुरुस्त करण्याचा.

ऑर्कुट वरचे अनुभव आणखीच रसभरीत. (आता रसभरीत म्हणून हसू येतं, तेव्हा संताप व्हायचा.) तीन समूहांवर ह्या चर्चा चालल्या. शेवटी दगडावर डोकं आपटून घेतल्यासारखा वाटायला लागलं. सर्वसाधारणपणे सूर वर्तमानपत्रातल्या प्रतिक्रिया चर्चांचाच. "तुम्ही काय, फिरंगी अनिवासी भारतीय" अशा अर्थाचा. दोन्ही ठिकाणी, सर्वात टोचणी लागायची ती अशासाठी, की बाहेरचं जग पाहता, अज्ञानाच्या भिंतींच्या घरात बंदिस्त राहून, आंतरजालाच्या बुरख्याच्याआतून वार करायला ही मंडळी यथेच्छ कीबोर्ड बडवत बसायची! त्यातल्या काही नमुनेदार गोष्टी, योग्य संदर्भात पुढच्या काही भागांमध्ये सांगेनच!

मला पूर्ण कल्पना आहे, की ह्या सारांशसदृश लिखाणामुळे उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त उभे राहिले असणार. ही पोस्ट अवाच्यासवा मोठी होऊ नये म्हणून आवरती घेतो. अशा काही प्रश्नांवर थोडा प्रकाश आत्ता पाडता येईल :
  • ऑस्ट्रेलिया मध्ये वर्णद्वेष अजिबात नाही असं मला म्हणायचं आहे का? थोडक्यात उत्तर : वर्णद्वेष नाही असं ठिकाण जगात नाही. उघड उघड, कायदेशीर रीत्या, किंवा छुपा वर्णद्वेष सगळीकडेच आहे. त्याचा कोणाला, आणि खरोखर किती त्रास होतो हे पाहणं महत्वाचं आहे.
  • ऑस्ट्रेलिया हा गुन्हेगारांच्या वंशजांचा देश आहे ना? असली विधानं केवळ 'प्रगल्भ' अज्ञानातूनच जन्म घेऊ शकतात! मनाचे दरवाजे उघडे ठेवून, थोडा इतिहास पहिला तर असे प्रश्न उद्भवणार नाहीत!
  • भारतीय विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येने तिकडे शिकायला का जातात? ह्या प्रश्नाच्या उत्तरात अनेक मनोरंजक गोष्टी दडलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आणखी पण बरीच मनोरंजक माहिती बाहेर येईल.
  • ऑस्ट्रेलिया मध्ये खरोखरच जीवनशैली कशी आहे? ह्याचं माझ्या नजरेतून, मला मिळालेलं उत्तर जरूर देईन.

आणखी बरंच काही, लवकरच!

***************************

1 comment:

Vinayak Pandit said...

खूपच विस्तृत आणि माहितीपूर्ण लेख अविदादा! खरंतर कधीतरी तुला याबद्दल विचारीन असं माझ्याही मनात आलं. तुझं निरीक्षण आणि तुझा दृष्टीकोन पटला. अशा दृष्टिकोनातून विचार करणार्‍यांना लोक काय म्हणतात तेही तू लिहिलंयस तसंच आहे! :)
दुसरं म्हणजे नेटवर चर्चा करत बसणं वायफळ आहे का रे? मला तसं वाटू लागलं आहे. गोल गोल, भलतेच मुद्दे, आपल्या म्हणण्याचा विपर्यास आणि अतिरेकी विचारांना भरघोस पाठिंबा असं सर्वत्र नव्हे पण सर्वसाधारणपणे दिसतं, नाही?
पुढचं लिखाण वाचायला आतूर आहे.
तू सलग लिहायला लागला आहेस हे बघून खूप आनंद झाला! :D मन:पूर्वक शुभेच्छा अविदादा!